‘बँकांचे पैसे लुटा आणि पळ काढा’, हेच सरकारचे धोरण; एबीजी शिपयार्डच्या गैरव्यवहारावर काँग्रेसचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
randeep-surjewala

एबीजी ग्रुपने (एबीजी शिपयार्ड) सुमारे दोन डझनपेक्षा जास्त बँकांनी चुना लावला आहे. या गैरव्यवहारावर काँग्रेसने सत्ताधारी भआजप सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या सात वर्षांच्या नरेंद्र मोदी सरकारच्या काळात बँकांच्या एनपीएमध्ये मोठी वाढ झाली आहे. बँकांचे पैसे लुटा आणि पळ काढा हेच सरकारचे धोरण असल्याचा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

हा आतापर्यंतचा सर्वात मोठा गैरव्यवहार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि माजी अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांनी एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघांना 22,842 कोटींचा चुना लावल्याचा आरोप आहे. आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना मोदी सरकारच्या काळात गैरव्यवहार करण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मोदी सरकारच्या काळातील 75 वर्षांतील ही सर्वात मोठी लूट आहे. 2,20,00,00,00,842 रुपयांच्या जनतेच्या पैशांची लूट करण्यात आली आहे, असे ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे. गेल्या सात वर्षात 5,35,000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांनी आपली बँकिंग व्यवस्था डळमळीत केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एबीजी ग्रुपच्या या गैरव्यवहाराने आतापर्यंतचे गैरव्यवहाराचे सर्व आकडेवारी मोडीत काढल्या आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. चरणजीत चन्नी यांचे 5 वर्षांपूर्वी कोठेही नाव नव्हते. मात्र, निवडणुकीच्या 10 दिवस आधी त्यांच्यावर आरोप कसे होत आहेत, असा सवालही त्यांनी केला. आप आणि भाजप यांचे एकच धोरण आहे. फूट पाडा आणि राज्य करा, हे दोन्ही पक्षांचे धोरण आहे. सुरजेवाला यांनी आपची तुलना मुगल आणि इंग्राजांच्या राजवटीशी केली आहे.