संसदेच्या संविधान दिनावर विरोधकांचा बहिष्कार, शिवसेना खासदारही सहभागी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात घटनाबाह्य कृतीचा अवलंब करून सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून सरकारच्या वतीने 26 नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात येणाऱया कार्यक्रमावर सर्व विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदारही यामध्ये सहभागी होणार आहेत.

लोकशाही व्यवस्थेत सत्तास्थापनेसाठी भाजपाकडून ज्या घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब केला जात आहे त्याचा शिवसेना आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सोमवारी संसद सभागृहात निषेध केला. मंगळवारी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत संसदेच्या परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान ग्रथांचे पूजन व अभिवादन सर्व विरोधी पक्षांकडून करण्यात येणार आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना शिवसेना खासदारांना दिल्याची माहिती शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिली. शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते माजी मंत्री अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याची भेट घेऊन संविधान ग्रंथ पूजन व अभिवादन कार्यक्रमाबाबत सहमती दर्शविली.