
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सहकार विभागाने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घतला आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले आहेत. मात्र, ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत त्या निवडणुका मात्र घेतल्या जाणार आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर 18 मार्च 2020 रोजी आदेश काढून तीन महिने निवडणुकांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी आदेश जारी करून सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. 24 फेब्रुवारीच्या आदेशानुसार 31 मार्च 2021 पर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.
त्यामुळे एप्रिलमध्ये पुन्हा निवडणुकांचा बिगुल फुंकला जाणार होता. मात्र, राज्यात कोरोनामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकाही जवळपास पाच महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 व (क) मधील तरतुदी नुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका या एक वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी पुढे ढकलता येत नाहीत. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या तरतुदीतून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




























































