कोरोना आणि 50 टक्के अटीने रेल्वे आणि बसचे प्रवासी घटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि त्यापाठोपाठ सरकारी आणि खाजगी कार्यालयातील कर्मचाऱयांची पन्नास टक्के उपस्थिती बंधनकारक केल्यामुळे मुंबईतील लोकलची आणि बेस्टची प्रवासी संख्या अचानक घटली आहे. मध्य रेल्वेतून दररोज प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या दोन लाखांनी घटली आहे. तर पश्चिम रेल्वेची रोजची प्रवासी संख्या सुमारे एक लाखाने कमी झाली आहे. तर बेस्टच्या रोजच्या प्रवाशांची संख्या देखील लाखभराने घटली आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे सरकारने 15 मार्च रोजी आदेश काढून सरकारी आणि खाजगी कार्यालयातील कार्यालयात 50 टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. त्यामुळे अचानक लोकल ट्रेन आणि बसमधील गर्दी काहीशी कमी झाल्याचे दिसत आहे. मध्य रेल्वेच्या लोकलमधून जानेवारी महिन्यात दररोज सरासरी 13 लाख प्रवासी प्रवास करीत होते. फेब्रुवारीत हीच संख्या 20 लाखांपर्यंत गेली होती. तर 15 मार्चपर्यंत ही संख्या 21 लाखांपर्यंत गेली होती. राज्य सरकारने कर्मचाऱयांची कार्यालयातील उपस्थिती 50 टक्के केल्यानंतर मध्य रेल्वेची प्रवासी संख्या घटली असून आता ही प्रवासी संख्या 19 लाखांपर्यंत पोहोचली आहे.

लाखभर प्रवासी कमी झाले…
पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून 14 मार्च रोजी दररोज सुमारे 18 लाख प्रवासी प्रवास करीत होते. 22 मार्चपर्यंतही प्रवासी संख्या एक लाखाने कमी होत 17 लाखापर्यंत पोहोचली. बेस्ट उपक्रमातील प्रवासी संख्याही काहीशी रोडावली आहे. 15 मार्च रोजी बेस्टची रोजची सुमारे 25 लाख असलेली प्रवासी संख्या 24 लाखापर्यंत घटली असून लाखभर प्रवासी कमी झाले आहेत.