#CoronaEffect सोन्याच्या दरात दोन हजारांची घट, आता मिळणार इतक्या किमतीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन लगीनसराईचे दिवस, त्यात घोंघावणारं कोरोनाचं संकट आणि बिकट झालेली आर्थिक स्थिती अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारं वृत्त आहे. एकिकडे सेन्सेक्स कोसळला असला तरी कोरोनाच्या परिणामामुळे सोन्याच्या दरातही घट झाली आहे.

शुक्रवारी शेअर बाजार 3100 अंकांनी घसरला. त्यामुळे बाजारात लोअर सर्किट लावण्यात आलं आणि सर्व व्यवहार थांबवण्यात आले. कोरोना व्हायरसमुळे हा परिणाम दिसून येत असून या घसरणीमुळे शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळेच गेल्या आठवड्यापर्यंत 44 हजारांपार गेलेल्या सोन्याच्या दरात शुक्रवारी तब्बल दोन हजारांची घट झाली आहे. त्यामुळे आता सोनं 41 हजार 600 रुपयांवर आलं आहे.

या वृत्तामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. कारण, नोव्हेंबर ते मे-जून हा टप्पा लगीनसराईचा हंगाम म्हणून ओळखला जातो. आणि ऐन लगीनसराईत सोन्याची दरवाढ झाल्याने अनेकांच्या मनात धडकी भरली होती. मात्र, आता सोन्याचे दर घटल्याने सामान्यांना हायसं वाटत आहे.