
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस शासनाने परवानगी दिली मात्र त्याचा फायदा घेऊन अनेक साठेबाजांनी अव्वाच्या सव्वा दराने किराणा सामान विक्री सुरू केली आहे. 85 रुपये किलोचा शेंगदाणा चक्क 110 रुपये किलोने विक्री केला जात आहे, तर दिडशेची दारू क्वार्टर साडेतीनशे रुपयांना चोरून विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे.
याप्रमाणे अनेक होलसेल व्यापारी व अनेक कंपन्यावाल्यांनी हात मिळवणी करून चढया भावाने खाद्यपदार्थ विकत असलेल्याने छोटे- छोटे दुकानदारांना देखील त्यामुळे चढया भावाने खाद्यपदार्थ विकण्याची वेळ आली आहे. ज्या खाद्यपदार्थांचे भाव अचानक वाढवले त्यामध्ये तेल ,शेंगदाणा , साबुदाणा , पोहे , दाळी आदींचा समावेश आहे. हे साहित्य प्रति किलो 15 ते 25 रूपयांच्या फरकाने विक्री होत आहे. नागरिकांना देखील पर्याय नसल्याने जादा दराने सामान घ्यावे लागत आहे. याच बरोबर काही बिअरबार चालक आपल्या बंद दुकानाच्या आजूबाजूला बसून छुप्या पद्धतीने दारू दुप्पट भावाने विकत असल्याने तळीरामांची अडचण झाली आहे. दारू विक्रीस बंदी असतांना देखील हा प्रकार सर्रास सुरू आहे. मॅकडॉल कंपनीची 150 रुपयांची क्यार्टर 350 रुपयांना तर ऑफिसर चॉईसची 130 रुपयांची क्यार्टर 350 रुपये, ब्लेंडर स्पाईट 320 रुपयांची 600 रुपये एवढ्या चढ्या दराने विकण्याचा प्रकार सुरू आहे, त्यामुळे रोज दारू ढोसणारे तळीराम या लुटीमुळे त्रस्त झाले आहेत.



























































