राज्यातील रुग्णसंख्या 43183, मुंबई चिंताजनक,दिवसभरात 8646 रुग्ण सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत    मुंबईत झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढत असून आज एकाच दिवसात 8 हजार 646 कोरोनाबाधितांची नोंद झाली. एकाच दिवसात आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णनोंद आहे. त्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे गेल्या 24 तासांत मुंबईत 18 जणांचा बळी गेला आहे.

मुंबईत पालिकेच्या वर्षभराच्या लढय़ानंतर आटोक्यात आलेला कोरोना फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा वाढू लागला आहे. जानेवारीअखेर फक्त 334 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या आज थेट साडेआठ हजारांवर गेल्याने मुंबईची चिंता वाढली आहे. दिवसभरात तब्बल 8,646 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 लाख 23 हजार 360 वर पोहोचली आहे. तर 18 रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11,704 वर पोहोचला आहे. दरम्यान, दिवसभरात 5,031 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 3 लाख 55 हजार 691 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 55 हजार 5 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

धारावीत रुग्णसंख्या वाढतीच

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाविरोधात मिशन धारावी, मिशन झीरोसारख्या मोहिमा अत्यंत आक्रमकपणे राबवून मुंबई महापालिकेने धारावीत कोरोना नियंत्रणात आणला होता, मात्र गेल्या काही दिवसांत धारावीत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.

  • आज दिवसभरात धारावीत 71, दादरमध्ये 104 तर माहीममध्ये 101 रुग्ण सापडले. त्याचबरोबर धारावीत सक्रिय रुग्णांची संख्या 629, दादरमध्ये 927 तर माहीममध्ये 1070 वर पोहोचली आहे. दरम्यान, बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर या भागांतही सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागांत कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

कोविड अपडेट

गुरुवारची रुग्णसंख्या

  • ठाणे      1465
  • नाशिक  1781
  • पुणे       4200
  • संभाजीनगर     943
  • नागपूर  2587