
कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत आला आहे. दुधाचे दर प्रति लिटर तब्बल 12 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुऴे पाण्याच्या भावात दुध विकले जात आहे. दुध उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून बळीराजा शेतकरी हा दुग्ध व्यवसायाकडे वळला मात्र आता हाच दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असून संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातल्याने देश तब्बल 21 दिवस लॉक डाउन झाला आहे. याचा सर्वाधिक फटका दुध उत्पादक शेतकर्यांना बसला असून दुधाचे खरेदी दर हे खासगी डेर्यांनी तब्बल 12 रूपयांनी कमी केले आहेत. दुधाचे दर हे 32 रूपये लिटर वरून थेट आता 20 रूपये लिटर वर आले आहेत.
जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या वाढलेल्या किंमती आणि चार्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल 25 ते 30 रुपयांपर्यंत खर्च येतो मात्र हेच दूध सध्या 20 रुपये लिटर ने विकले जात असल्याने शेतकऱ्यांना लिटरमागे तब्बल दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे जनावरांना लागणारा खुराक हि लॉकडाऊन मुळे वेळेवरती मिळत नसल्याने दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
कोरोना मुळे दुग्धव्यवसावरती मोठा परिणाम झाला असून कामगारांची घटलेली संख्या, कोलमडलेली वाहतुक व्यवस्था, दुध प्लांट चालवण्यासाठी लागणार्या साधन सामग्री चा अपुरा पुरवठा व दुध पावडरचे घटलेले ग्राहक आणि कोरोना मुळे शहरात होणारा दुधाचा कमी पुरवठा यामुळे दुधाचे दर घसरल्याचे पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे चेअरमन विष्णु हिंगे यांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकारने आता यात लक्ष घालून दुध उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे अशी विनंती शेतकर्यांनी केली आहे.




























































