धारावी, दादर, माहीममध्ये रुग्ण घटले; दिवसभरात 5 कोरोना रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून कोरोनाविरोधात राबवण्यात येत असलेल्या मोहिमांमुळे जी/उत्तर वॉर्डमध्ये येणाऱ्या धारावी, दादर आणि माहीममध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या घटत असून दिवसभरात कोरोनाचे 5 रुग्ण सापडले. धारावीत 1, दादरमध्ये 1 तर माहीममध्ये दिवसभरात 3 रुग्ण सापडले. आतापर्यंतची ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची धारावीत ‘मिशन धारावी’, ‘चेस द व्हायरस’ आणि ‘मिशन झिरो’बरोबरच राज्य सरकारची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटली आहे. धारावीत दिवसभरात 1, दादरमध्ये 1 तर माहीममध्ये 3 रुग्ण सापडले आहेत. धारावीत सध्या 58, दादरमध्ये 115 तर माहीममध्ये सध्या 283 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत.

धारावीनंतर दादर संवेदनशील भाग
धारावीनंतर दादर हा जी/उत्तरमध्ये येणारा अत्यंत संवेदनशील भाग आहे. दादरमध्ये मध्यम वर्गीय, उच्च मध्यमवर्गीय तर राहतातच, पण दादर हे मध्यवर्ती ठिकाण असून दिवाळीनिमित्त सर्व प्रकारच्या किरकोळ आणि घाऊक खरेदी-विक्रीसाठी सर्व ग्राहकांची झुंबड इथे उडते. रेल्वे, रस्ते मार्गे दररोज येणाऱ्या हजारो ग्राहकांमुळे दादर गजबजून जाते. मात्र, दिवाळीची खरेदी करताना दादरमध्ये कोरोना पुन्हा मोठय़ा प्रमाणात डोके वर काढू नये, यासाठी पालिका अधिकारी दक्ष आहेत. मास्क न लावणाऱया, रस्त्यावर थुंकणाऱया आणि सुरक्षित अंतर न ठेवणाऱया विरोधात पालिकेची धडक कारवाई या विभागातही सुरूच आहे. त्याचबरोबर कोरोनाविरोधात मोठय़ा प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे.