
दिवाळीच्या तोंडावर मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी दरदिवशी कमी होत असून जी/उत्तरमध्ये केवळ 10 कोरोना रुग्ण सापडले. यात दादरमध्ये 2, माहीममध्ये 2 तर धारावीत 6 रुग्ण सापडले. त्यामुळे दादर, माहीम आणि धारावीकरांना मोठया प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेच्यावतीने ‘चेस द व्हायरस’ आणि ‘मिशन झिरो’बरोबरच राज्य सरकारची ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमा अत्यंत आक्रमकपणे राबवण्यात आल्या. त्याचे परिणाम आता मुंबईभर दिसत असून गेल्या काही दिवसांपासून जी/उत्तरमध्ये मोठय़ा प्रमाणात रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे.
जी/उत्तरमध्ये येणाऱ्या धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली पालिका कर्मचारी, स्वयंसेवक तसेच आरोग्य अधिकारी, सेवक अहोरात्र मेहनत घेत आहेत. दादर आणि माहीममध्ये आरोग्य शिबिरे तसेच चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली. मात्र, त्यानंतरच त्यावर नियंत्रण शक्य झाले. धारावीप्रमाणेच दादर आणि माहीममध्ये दररोजची रुग्णसंख्या 10 ते 15 राखता आली.
पालिका आणि राज्य सरकारने राबवलेल्या एकत्रित मोहिमा आणि पालिका कर्मचाऱ्यांची अहोरात्र मेहनत यामुळे हे शक्य झाले, अशी माहिती साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
धारावीत केवळ 97 ऑक्टिव्ह रुग्ण
पालिका आणि राज्य सरकारच्या मोहिमा आणि कठोर उपाययोजनांमुळे आशियातील सर्वात मोठय़ा दाटीवाटीची झोपडपट्टी असलेल्या धारावीत आता केवळ कोरोनाचे 97 ऑक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धारावीत आतापर्यंत 3 हजार 568 रुग्ण सापडले असून 3,162 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याखालोखाल दादरमध्ये 181 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत. दादरमध्ये 4,354 रुग्ण सापडले असून आतापर्यंत 4 हजार 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत. माहीममध्ये 351 ऑक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत 4,098 रुग्ण सापडले असून 3,609 जण कोरोनामुक्त झाले आहेत.


























































