‘कोरोना’ झपाट्याने पसरतोय, रुग्णसंख्या 34 वर पोहोचली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

देशात ‘कोरोना’ झपाटय़ाने पसरतोय. आज तामीळनाडूत एक आणि लडाखमध्ये दोन संशयित रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या 34 वर पोहचली आहे. ‘कोरोना’मुळे पर्यटन क्षेत्राला जबर धक्का बसला असून केंद्र सरकार ‘कोरोना’मुळे टेन्शनमध्ये आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱयांची तातडीची बैठक घेऊन उपाययोजनांची माहिती घेतली. देशवासीयांनी ‘कोरोना’ला घाबरू नये. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जनतेने शेकहॅण्ड बंद करावा आणि नमस्ते सुरू करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

‘कोरोना’ग्रस्त संशयित रुग्णांबाबत सोशल मीडियावर वृत्त पसरत असले तरी अधिकृत दुजोरा मिळत नाही. आज मात्र तीन संशयित रुग्ण सापडल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. ओमानमधून तामीळनाडूत दाखल झालेला एकजण आणि इराणहून लडाखला परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

दिल्लीत बैठका
‘कोरोना’चा प्रसार वाढू नये यासाठी दिल्लीत बैठका सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आढावा बैठक घेतली. कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी देशात 52 प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितले.

आयपीएलवर कोरोनाचे मळभ
आयपीएल क्रिकेट स्पर्धा देशपातळीवर खेळविण्यात येणार आहेत. राज्यात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून आयपीएलसारख्या स्पर्धा ‘कोरोना’चा धोका दूर होईपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या आहेत.

राज्यात 229 प्रवासी कोरोना निगेटिव्ह
महाराष्ट्रात 229 प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. हे सर्व प्रवासी निगेटिव्ह आढळले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबई आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर 793 विमानांमधील 96 हजार 493 प्रवासी तपासण्यात आले आहेत. मुंबईसह पुणे व नागपूर विमानतळावरदेखील स्क्रिनिंग सुरू झाले आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 532 प्रकासी आले आहेत. सध्या राज्यात निरीक्षणाखाली 15 प्रवासी आहेत. यापैकी सध्या 12 जण मुंबईत तर तीन जण पुणे येथे रुग्णालयात भरती आहेत.

जहाजांना 31 मार्चपर्यंत बंदी
हिंदुस्थानी किनाऱयावर 31 मार्चपर्यंत परदेशी जहाजांना बंदी घालण्याचे आदेश आज सरकारने दिले आहेत. त्यामुळे मुंबईसह अनेक किनाऱयांवर काही जहाजे आणि त्यावरील प्रवासी व कर्मचारी अडकून पडल्याचे वृत्त आहे.

मोबाईलवर ‘ऍलर्ट’ कॉलरटय़ून
दूरसंचार विभागाच्या आदेशानंतर सर्व मोबाईल ऑपरेटर्स कंपन्यांनी आपापल्या ग्राहकांच्या कॉलरटय़ूनमध्ये बदल केला आहे. आता तेथे कोरोनाच्या जनजागृतीची कॉलरटय़ून वाजू लागली आहे. मात्र ज्यांनी कॉलरटय़ून सबस्क्राईब केली आहे त्यांच्या मोबाईलमध्ये ही ऑडिओ क्लिप वाजणार नाही.