दिलासादायक, राज्यात कोरोना चाचणी आणखी स्वस्त

राज्यातील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. प्रति चाचणी हे दर 200 रुपयांनी कमी करण्यात आले असून आता 980 रुपयांत कोरोना चाचणी होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या सुरुवातीला तब्बल 4500 रुपयांत होणारी ही चाचणी आता 980 रुपयांत करणे शक्य होणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.

कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करून तपासणी करण्यासाठी 1400 रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1800 रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे.

सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट आणत रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात असून प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून कोरोनावर अधिक नियंत्रण मिळविता येईल. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या