अमेरिका, युरोपातील लसी हिंदुस्थानात द्या! मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशामध्ये वाढणारा कोरोनाचा संसर्ग पाहून यावर उपाययोजना सुचवणारा पाच कलमी कार्यक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे दिला आहे. अमेरिका, युरोपीय देशांनी ज्या लसींना मंजुरी दिली आहे अशा लसींचा समावेश आपल्या देशातील लसीकरण मोहिमेत करून कोरोनावरील लसीकरण मोहिमेला गती देण्याची गरज आहे. अशा महत्त्वाच्या सूचना या पाच कलमी कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांना मनमोहन सिंग यांनी केल्या आहेत.

मनमोहन सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनावरील लसीची गती आणखी वाढवावी लागेल. कारण कोरोनावरील उपचारासाठी हे महत्त्वाचे आहे. किती लोकांचे लसीकरण झाले यापेक्षा लोकसंख्येच्या किती टक्के लसीकरण झाले आहे हे महत्त्वाचे आहे. तसेच 45 वर्षांहून कमी वयाच्या लोकांनादेखील लसीकरण करण्यात यावे म्हणजे ज्यांचे वय 45पेक्षा कमी आहे पण हे फ्रंटलाइन वर्कर्स व आरोग्य कर्मचारी आहेत, शिक्षक, बस, टॅक्सीचालक आहेत त्यांनासुद्धा प्राधान्याने लस दिली पाहिजे, असे मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे सुचवले आहे.

मनमोहन सिंग पुढे पत्रात म्हणतात की, लस उत्पादकांना कोरोनावरील किती डोसची ऑर्डर दिली गेली आहे आणि पुढील सहा महिन्यांत किती डोसचा पुरवठा केला जाईल याची माहिती सरकारने जनतेला दिली पाहिजे. तसेच पुढील सहा महिन्यांत किती लोकसंख्येचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आपल्याकडे किती लसीचा साठा उपलब्ध करावा लागेल किंवा त्यासाठी किती ऑर्डर द्यावी लागेल का त्याचबरोबर विविध राज्यांना अपेक्षित असलेला लसीचा साठा कसा मिळेल, असे काही प्रश्न मनमोहन सिंग यांनी लिहिलेल्या या पत्रात उपस्थित केले आहेत.

पाच कलमी कार्यक्रम

मनमोहन सिंग यांचा कोरोनावर उपाययोजना सुचवणारा पाच कलमी कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

  • पुढील सहा महिन्यांसाठी किती लसींची ऑर्डर दिली आहे हे जाहीर करावे.
  • राज्यांना अपेक्षित असलेला साठा कसा पुरवला जाईल याबाबत संकेत द्यावेत.
  • राज्यांना प्रंटलाइन वर्कर्सची श्रेणी ठरवण्यासाठी सूट द्यायला हवी.
  • लस निर्मात्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी सवलती द्या.
  • वापरासाठी परवानगी दिलेल्या कुठल्याही लसीच्या आयातीसाठी परवानगी द्यावी, या पाच मुद्दय़ांचा या पत्रामध्ये समावेश आहे.