‘केईएम’मध्ये कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू, तीन जणांना दिला डोस; प्रकृती उत्तम

कोरोना लसीची मानवी चाचणी पालिकेच्या केईएम रुग्णालयात आजपासून सुरू झाली आहे. यामध्ये तीन जणांना ‘कोव्हिशिल्ड’ लस देण्यात आली असून तिघांचीही प्रकृती उत्तम आहे. या रुग्णांना एका महिन्याने पुन्हा लस देण्यात येणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

मुंबईसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर मुंबईत लस कधी दिली जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. राज्य सरकारच्या एथिकल समितीने याला मंजुरीही दिली आहे. यानुसार पालिकेच्या केईएम रुग्णालयात या लसीची मानवी चाचणी सुरू झाली आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात कोरोना लस चाचणीसाठी 350 स्वयंसेवकांनी अर्ज केले आहेत. मात्र या ठिकाणी 100 जणांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, सिरम इन्स्टिटय़ूटने बनवलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लसीच्या मानवी चाचणीला पहिल्यांदा पुण्यात सुरुवात झाली आहे. कोरोनावरील मानवी चाचणी पात्र ठरलेल्या स्वयंसेवकांना 35 लाख रुपये विमा संरक्षण तर समूह विमा संरक्षण म्हणून 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

‘नायर’मधील ‘त्या’ डॉक्टरांची प्रकृती स्थिर

दरम्यान, पालिकेच्या नायर रुग्णालयात काम करणाऱया आणि कोरोनामुक्त झालेल्या तीन डॉक्टरांमध्ये कोरोनाची पुन्हा लक्षणे दिसत असल्याचे समोर आल्यामुळे संबंधित डॉक्टरांना नायर रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या स्वॅबचे नमुने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नसला तरी तिघांचीही प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

नायरमध्ये सोमवारपासून मानवी चाचणी

नायर रुग्णालयातही सोमवारपासून कोरोना लसीची मानवी चाचणी केली जाणार असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली. ‘आयसीएमआर’नेही चाचणीला मंजुरी दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नायरमध्ये 100 स्वयंसेवकांची निवड करून त्यांच्यावर कोव्हिशिल्डची चाचणी केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या