Corona virus – शेकडो वर्षांची परंपरा असलेली महाकाली यात्रा रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरची प्रसिद्ध देवी महाकाली यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. दरवर्षी ही यात्रा चैत्रात होत असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे ही यात्राच रद्द करावी लागली. शेकडो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे.

जगभर कोरोना आजाराने थैमान घातल्याने खबरदारीचा उपाय सर्वत्र घेतला जात आहे. चंद्रपुरातील प्रसिद्ध देवी महाकाली यात्रा याच महिन्याच्या 30 तारखेपासून सुरू होणार होती. मात्र कोरोनाच्या भीतीच सावट बघता जिल्हा प्रशासनाने ही यात्रा रद्द केली. आज जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि महाकाली मंदिर ट्रस्ट यांच्यात बैठक झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी उपस्थित होते. शेवटी ही यात्रा यावर्षी रद्द करून गर्दी टाळण्याचा निर्णय घेतला गेला. मंदिरातील दैनंदिन पूजा आणि धार्मिक विधी मात्र नियमित राहणार आहेत.

या यात्रेसाठी मराठवाडा, खानदेश, विदर्भासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश इथुनही भाविक लाखोंच्या संख्येने येत असतात. महिनाभर चालणारी ही यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आल्याने संसर्ग टाळण्यासाठी आज हा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रा रद्द झाल्याने भाविकांनी धोका पत्करून येऊ नये, असं आवाहनही प्रशासनाने केले आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2704086893159980&id=1855540004681344