
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी शासनाने केलेल्या आवाहनाला शनिवारी सकाळच्या काही काळानंतर शंभर टक्के प्रतिसाद दिल्याने माजलगाव व परिसरातील गावांमध्ये सर्व व्यवहार बंद ठेऊन शासनास सहकार्य केले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी अत्यावश्यक सेवा वगळून, सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिले आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने दुपारी शुकशुकाट जाणवत होता मात्र किराणा दुकाने देखील अत्यावश्यक असतांना या दुकानदारांनी देखील आपली दुकाने बंद ठेवल्याने लोकांचे हाल झाले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्याधिकारी यांनी दिले आहेत, महसूल व पोलीस प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतलीं जात आहे. पोलिसांनी सकाळी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले मात्र बीड रोड, आंबेडकर चौक,मोंढा या भागात व्यवहार सुरूच असल्याने स्वतः उपविभागीय अधिकारी शोभा ठाकुर, तहसीलदार प्रतिभा गोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत ढीसले,पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी लोकांना बंदचे आवाहन केले,अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरले त्यानंतर दुकाने बंद करण्यात आली.
सर्वत्र नागरिक तोंडास मास्क, रुमाल, बांधून स्वतःच आरोग्याची काळजी घेताना दिसून येत होते.तर नगर परिषदेच्या वतीने शहरातील प्रमुख चौक स्वच्छ पाण्याने धुऊन काढण्यात आले




























































