
मलेशियामधली एक मशिद सध्या जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीमध्ये क्लालालंपूरमधल्या एक मशिदीमध्ये आलेल्या लोकांनी आग्नेयेकडील देशात या आजाराचा जास्त फैलाव केला असल्याचं म्हटलं आहे. क्वालालांपूरमधल्या सिरी पेतालिंग भागामध्ये ही मशिद आहे. याच भागामध्ये कोरोना व्हायरसची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे.
27 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान या मशिदीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला 16 हजारांपेक्षा जास्त लोकं हजर होते. यामध्ये 1500 विदेशी नागरिकांचा समावेश होता. मलेशियाचे आरोग्यमंत्री अधम बाबा यांनी माहिती दिली आहे की मशिदीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे या आजाराचा फैलाव झाला आणि यामुळे एका 34 वर्षांच्या मलेशियाच्या नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
मलेशियामध्ये 673 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण असे आहेत जे या मशिदीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अधम बाबा यांनी सांगितलंय की मशिदीमध्ये 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यामुळे संपूर्ण शहरात या आजाराचा फैलाव झाला. या कार्यक्रमामध्ये कोरोना व्हायरस बाधित व्यक्ती कोण होती जिच्यामुळे हा आजार फैलावला हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या 6 जणांशी संपर्क साधला होता. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून हा आजार कसा फैलावत गेला हे कळायला लागलं. तबलिगी जमात नावाच्या संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.सरकारने आता ही मशिद बंद केली आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या एका व्यक्तीने प्रतिक्रिया देताना म्हटलंय की अनेक जणांना वेगवेगळ्या ठिकाणी देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी कॅनडा, नायजेरिया, हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया या देशातूनही काही जण आले होते. याशिवाय चीन, दक्षिण कोरिया या देशातूनही काही जण या कार्यक्रमात सहभागी जाले होते. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर तो जगभरात पसरला होता. दक्षिण कोरियामध्येही या आजाराची अनेकांना लागण जाली आहे.
या कार्यक्रमात सहभागी झालेले सगळेजण नमाझ पढण्यासाठी सगळे जण दाटीवाटीने बसले होते तसेच सगळ्यांनी एकत्र जेवण केलं होतं यामुळे या आजाराचा मोठ्या प्रमाणावर इथेच फैलाव झाला असावा असा अंदाज आहे. मलेशियामध्ये या आजाराचा ज्या वेगाने फैलाव होतोय ते पाहिल्यानंतर शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद करण्यात आली आहे. दोन आठवड्यांसाठी सगळ्या मशिदीही बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या एका युवकाने रॉयटर्सशी बोलताना सांगितले की कार्यक्रमामध्ये गर्दी असल्याने सगळेजण दाटीवाटीने बसले होते. कंबोडियामधील बात्तमबांग भागामध्ये या युवकावर उपचार सुरू असून त्याला या जीवघेण्या आजाराची लागण झाल्याचे निदान करण्यात आले आहे. आपल्याला वाळीत टाकतील या भीतीने त्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सगळी माहिती दिली. या तरुणाने सांगितलं की ‘अशा कार्यक्रमांमध्ये एकमेकांचा हात हातात घेणं ही सर्वसामान्य बाब आहे. कोणालाही भेटलो की आपण हस्तांदोलन करतो तसं या कार्यक्रमामध्येही होत होतं. या कार्यक्रमात आलेल्या कोणत्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती हे माहिती नाही.’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अन्य दोघांनी सांगितलं की आम्हाला आयोजकांनी हात धुण्याबाबत कोणतेही निर्देश दिले नव्हते. दोन व्यक्तींमधलं कमी अंतर, हस्तांदोलन, सोबत जेवणं या गोष्टींमुळे हा आजार पसरला असावा असा अंदाज आहे. मलेशियातील 56 पैकी 50 रुग्ण हे या मशिदीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते असं कळालं आहे. सिंगापूरचे 5, कंबोडियाचे 13, थायलंडचे 2 आणि व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशियाचे मिळून 700 जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सगळ्यांना शोधून त्यांची तपासणी करण्याचं काम सुरू आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात 2 लाख जण आजारी पडले असून 8 हजारांपेक्षा अधिक जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

























































