
मुंबईत कोरोना आता चांगलाच नरमला असून प्रसाराचे प्रमाण कमालीचे घटल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. एका रुग्णापासून इतरांना बाधित करण्याचा दर 1 पेक्षा खाली घसरून 0.94 पर्यंत खाली आला आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबरच्या पंधरवडय़ात कोरोनाची लागण सर्वाधिक खाली आल्याचे सर्वेक्षण चेन्नईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सने आपल्या अहवालात जाहीर केले आहे.
मुंबईत पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोरोना चाचण्या वाढवून एका रुग्णामागे तब्बल 15 ते 20 क्लोज काँटॅक्ट शोधून क्वारंटाइन आणि आवश्यक उपाययोजना करण्यात आला. त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यावर दुसऱया लाटेत दहा हजारांवर गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता कमालीची घटून 400 पर्यंत खाली आली आहे.
‘आर-व्हॅल्यू’ घटला
- एका रुग्णापासून किती जण बाधित होतात म्हणजेच ‘री-प्रोडक्शन नंबर’ किंवा प्रसाराचे प्रमाण ठरवले जाते. यामध्ये हा दर 1 पेक्षा जास्त असेल तर कोरोना प्रसार वेगाने होतो तर 1 पेक्षा कमी प्रमाण असल्यास आजार आटोक्यात असल्याचे मानले जाते.
- विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये मुंबईचा आर-व्हॅल्यू 28 ते 30 तारीखला 1.03 इतका होता. 10 आणि 12 ऑक्टोबर रोजी हेच प्रमाण 1.01 आणि 13 आणि 15 ऑक्टोबरदरम्यान 1.05 इतका राहिला.
- मात्र 16 आणि 18 ऑक्टोबरदरम्यान आर-व्हॅल्यू 0.94 इतका राहिला आहे. 19 ऑक्टोबरच्या 34428 चाचण्यांत 313 बाधित रुग्ण आढळले आहेत.




























































