इटलीत शिक्षणासाठी गेलेला राज्यातील विद्यार्थी घरी परतला, कुठलाही संसर्ग नसल्याचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

चीन पाठोपाठ इटली या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे तेथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरमधून उच्च शिक्षणासाठी इटली येथे गेलेला एक विद्यार्थी नगर शहरात नुकताच दाखल झाला आहे. विविध आरोग्य यंत्रणांनी त्याच्या कसून तपासण्या केल्या असून त्यास कोरोनाचा कुठलाही संसर्ग झाला नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे. या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे महापालिका आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी सांगितले.

तैवानने ‘अशी’ केली कोरोनावर मात… वाचा सविस्तर…

कोरोना विषाणूने सर्वात प्रथम चीनमध्ये थैमान घातले. चीननंतर इटली आणि इराणमध्ये करोनाचा मोठा संसर्ग झाला आहे. इटलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7,375 पर्यंत पोहचली असून 366 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीतील परिस्थिती चिंताजनक होवू लागल्याने तेथे नगरमधून उच्च शिक्षणासाठी गेलेल्या एका तरुणाने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. तो सुखरूप हिंदुस्थानात दाखल झाला. आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची कसून तपासणी झाली. विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. त्यानंतर तो नगरमध्ये आपल्या राहत्या घरी सुखरूप आला आहे.

परदेशातून देशात परतलेल्या सर्वच नागरिकांवर स्थानिक आरोग्य यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस लक्ष ठेवावे, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेले आहेत. त्यानुसार इटलीवरून नगरमध्ये दाखल झालेल्या तरुणावर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले. या तरुणाला कुठलाही संसर्ग झालेला नाही, सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे कोणीही याबाबत घाबरून जावू नये. या विषाणूचा संसर्ग होण्यापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही डॉ. बोरगे यांनी केले आहे.

इटलीत एका दिवसात सापडले 4636 रुग्ण

शनिवारी इटलीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली, तेव्हा अवघ्या एका दिवसात 4636 जणांना याची बाधा झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे इटलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,247वरून वाढून 5883 इतकी झाली आहे. तर इटलीत आतापर्यंत 233 जण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत.