
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात लॉकडाऊन सुरू असून उद्योगविश्वाने राज्य शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करावे. सरकारने जारी केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
वसई-विरार परिसरातील तीन औद्योगिक संघटनांच्या वतीने आयोजित चर्चासत्रात सुभाष देसाई बोलत होते. यावेळी वसई-विरार औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष अनिल आंबर्डेकर, गोवालिस संघटनेचे सी. ए. अँटो, वसई तालुका औद्योगिक संघटनेचे अभय जिन्सिवाले, आशीष आपटे सहभागी झाले होते. यावेळी उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर उपस्थित होते.
वसई पट्टय़ातील उद्योजक निर्यातीत आघाडीवर आहेत. शासनाने निर्यात प्रधान उद्योग सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे तसेच अत्यावश्यक सेवा, अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग, निरंतर प्रक्रिया करणारे उद्योग या साऱयांना उत्पादन सुरू ठेवण्याची संमती मिळाली आहे. उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे देसाई म्हणाले.
वसई-विरार परिसरातील उद्योग संघटनांनी आपल्या कर्मचाऱयांसाठी कोविड चाचण्या, रुग्णालय आदी सुविधा सज्ज ठेवल्याबद्दल उद्योगमंत्र्यांनी संबंधितांचे कौतुक केले.
कोविडची रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. पुढील पंधरा दिवसांत रुग्णवाढीचा वेग वाढण्यात शक्यता आहे. खाटांची संख्या कमी पडत आहे. ऑक्सिजनची गरज वाढली आहे. परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये यासाठी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. उद्योगविश्वाने या लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
- उद्योगांमध्ये 20 ते 40 वयोगटातील कामगार वर्ग मोठय़ा संख्येने काम करतो. लसिकरणासाठी 45 वर्षे वयाची अट आहे. ती अट शिथिल करून या 20 ते 40 वयोगटातील कामगारांचा लसीकरणासाठी समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कामगार कपात टाळा
कोरोना संकटामुळे राज्य शासन दुहेरी संकटात आहे. या संकट काळात उद्योगांना झळ बसणार आहे. त्यांनी ती सहन करण्याची तयारी दाखवावी. कामगारांच्या हिताचे रक्षण करावे व कामगार कपात टाळावी, असे आवाहन केले.


























































