
पालिकेच्या विविध खात्यांमध्ये कार्यरत असणाऱया कर्मचाऱयांना आपली सेवा बजावताना ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेणे पालिका प्रशासनाकडून याआधीच अनिवार्य करण्यात आले आहे. तरीदेखील अनेक विभागांत याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतली असून असा हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विभागाचे खातेप्रमुख व सहायक आयुक्तांचे एक वेतनवाढ रोखणार असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
पालिका कर्मचाऱयांच्या माध्यमातून मुंबईकरांना रस्ते साफसफाई, इमारतीची सफाई, गटार सफाई, पिण्याचे पाणी सोडणे, रुग्णालयातील नर्सेस, आया, वॉर्डबॉय, लॅब टेक्निशियन, डॉक्टर्स व त्यांच्या वरिष्ठांकडून सेवा देण्याचे काम केले जाते. या सेवा देताना संबंधितांनी स्वतःच्या संरक्षणासाठी प्रोटेक्टिव्ह ग्लोव्हज, मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, मात्र याबाबत सूचना देऊनही आवश्यक काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांना संबंधित विभागाचे सहायक आयुक्त व खातेप्रमुखांची एक वेतनवाढ रोखण्याचा इशारा दिला आहे.
भुयारी मार्गातील फेरीवाले हटवले
‘कोरोना’ धोक्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये असा इशारा राज्य सरकार, पालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गातील फेरीवाले हटविण्यात आले आहेत. फेरीवाल्यांमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.































































