
चीनसह जगभरात 100 हून अधिक देशांत पसरलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच चालला आहे. या विषाणूची दहशत कायम असून हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांची संख्या 59 वर पोहोचली आहे. दुसरीकडे चीनमध्ये या विषाणूने मंगळवारी एकाच दिवशी 17 जणांचा बळी घेतला. जगभरात चार हजारांहून अधिक लोकांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. एकूणच संपूर्ण जगापुढे या विषाणूचे मोठे आव्हान उभे आहे.
सुरुवातीला चीनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूने तीन हजारांहून अधिक चिनी नागरिकांचे बळी घेतले. त्यानंतर संपूर्ण जगभरात या विषाणूने हातपाय पसरले आहेत. जगभरातील बळींची संख्या 4,011 वर पोहोचली आहे, तर 1,10,000 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. हिंदुस्थानात केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बंगळुरू आणि जम्मू-कश्मीर या राज्यांना विषाणूच्या फैलावाची चिंता वाढली आहे. अवघ्या काही दिवसांत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 59 वर पोहोचली आहे.
इराणमधून परतले 58 हिंदुस्थानी
इराणमध्येही कोरोनाने हाहाकार उडवून दिला असताना तिथे अडकलेल्या 58 हिंदुस्थानींना अखेर हवाई दलाच्या विमानाने मायदेशी आणण्यात आले. गाझियाबाद येथील हिंडन हवाई दल स्टेशनवर सी-17 ग्लोबमास्टर हे विमान उतरविण्यात आले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली.
केरळमध्ये 6, तर कर्नाटकात 3 नवे रुग्ण
केरळमध्ये मंगळवारी कोरोना विषाणूचे 6 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 12 वर पोहोचली आहे. दुसरीकडे कर्नाटकात कोरोनाचे 3 नवीन रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 4 झाली आहे.
चीनमध्ये हॉटेल दुर्घटनेतील बळींची संख्या 20 वर
चीनमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी एका हॉटेलमध्ये विशेष वैद्यकीय केंद्र उभारले होते. संबंधित हॉटेल कोसळून जवळपास 70 कोरोनाग्रस्त ढिगाऱयाखाली दबले. यातील काहींची सुखरूप सुटका करण्यात आली. दुर्घटनेतील बळींची संख्या 20 वर गेली असून अजून 10 रुग्ण ढिगाऱयाखाली सापडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.




























































