
लोकल किंवा बस बंद करण्याचा राज्य सरकारचा अजिबात विचार नाही वा तसा निर्णयही घेतलेला नाही. मात्र लोकल, बसमधील गर्दी ओसरली नाही तर नाइलाजास्तव कठोर निर्णय सरकारला घ्यावा लागेल. म्हणूनच मुंबईकरांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.
मुंबईतील लोकल, मेट्रो, बस ही सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवणार अशी जोरदार अफवा आज पसरली होती. काही प्रसारमाध्यमांनीही तशा बातम्या दिल्या होत्या. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय होणार असेही ‘ब्रेकिंग’च्या नावाखाली ठामपणे सांगितले जात होते. नंतर तर सर्व सरकारी कार्यालयांना आठवडाभर सुट्टी दिल्याचेही वृत्त काहींनी बिनदिक्कतपणे चालवले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही वृत्तांचे ठामपणे खंडन केले. लोकल किंवा मेट्रो, बस बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. कठोर पावले उचलण्याची सरकारची इच्छा नाही, पण गर्दी ओसरली नाही तर नाइलाजाने निर्णय घ्यावा लागेल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना पुन्हा एकदा गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. अनावश्यक प्रवास टाळा, असे आवाहन केले.
41 पॉझिटिव्ह रुग्ण
राज्यामध्ये एकूण 41 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दुर्दैवाने त्यापैकी एका रुग्णाचा सकाळी मृत्यू झाला आहे. 26 पुरुष आणि 14 महिला आहेत. त्यांच्यापैकी एक रुग्ण गंभीर असून अन्य सर्व रुग्णांची परिस्थिती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
केंद्राकडून परवानगी मिळाल्यानंतरच लॅब वाढवणार
प्रायव्हेट लॅबला या चाचण्यांची परवानगी देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. लॅबची संख्या वाढविण्यासाठी केंद्राकडून परवानगी घ्यावी लागते. हे किट सरकारच्या माध्यमातून येत असतात. सध्या पुण्यातील एनआयव्ही लॅबकडे प्रमाणीकरणासाठी किट आलेले आहेत. मात्र त्याबाबत केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच त्याबाबत पुढे जाता येईल. चाचण्या प्रमाणीकरण झाल्यानंतर हे किट घेता येतील.
सरकारी कार्यालयांमधील उपस्थिती कमी ठेवणार
सरकारी कार्यालयांना आठवडय़ाची सुट्टी दिलेली नाही. मात्र 50 टक्क्यांवर कर्मचाऱयांची उपस्थिती आणून कामकाज करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. गर्दी कमी करण्यासाठी सरकार म्हणून जी आवश्यक पावले आहेत ती पावले आम्ही टाकत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
व्यापाऱ्यांना आवाहन
जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने व्यापाऱयांनी बंद ठेवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गर्दी टाळण्यासाठी हा उपाय करावा लागेल. पुण्यातील व्यापाऱयांनी स्वतःहून पुढाकार घेऊन दुकाने बंद ठेवली आहेत याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
































































