
‘शिक्षक कभी साधारण नहीं होता, प्रलय और निर्माण उसकी गोद में खेलते हैं,’ हे आचार्य चाणाक्य यांच्या चरित्रावरील मालिकेतील वाक्य प्रसिद्ध आहे. शिक्षकांची ताकद काय असते याचे उदाहरण समोर ठेवणारी एक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये परिस्थिती स्फोटक होती. सगळीकडे भीतीचे वातावरण होते. अनेक भागात नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाईन अभ्यासक्रमही सुरू नव्हता. शाळा बंद होती तरी पगार मात्र सुरू होता. शाळा बऱ्याच मोठ्या काळासाठी बंद असूनही आपला पगार होतोय, तेव्हा हा पगार चांगल्या कामाला लावावा, मनाचे समाधान होईल या भावनेने बीड येथील शिक्षकांनी स्वखर्चाने ग्रामीण भागातील शाळेचे रूपडे बदलले.
बीड तालुक्यातील पिंपळादेवी येथील जिल्हा परिषदेच्या मोडकळीला आलेल्या शाळेचा आठच दिवसात कायापालट झाला. शाळेचे नविन रूप बघून विद्यार्थी कुतुहलाने शाळेत येऊ लागले. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. गावकऱ्यांनाही उत्सुकता लागली. मग काही तरुणांनी शाळेत येऊन चौकशी केली. शाळेचे रंगरंगोटीचे काम झाले. निधी किती आला, खर्च किती झाला अशी चौकशी सुरू झाली. तेव्हा समोर आलेली बाब ऐकून सारेच स्तब्ध झाले.
लोकसहभागातून काम होत नाही हे शिक्षकांच्या लक्षात आले. मुख्याध्यापक लक्ष्मीकांत खडकीकर यांनी पुढाकार घेऊन सहशिक्षक असणाऱ्या चौघा जणांचे मतपरिवर्तन केले. कोरोनाच्या काळामध्ये शाळा सुरू नसतानाही पगार मिळालाच आहे ना, मग तो पगार आपण शाळेसाठी खर्च करू या भावनेतून लक्ष्मीकांत खडकीकर, बी.जे.कथले, अ.गो.कुलकर्णी, एम.बी.गायकवाड यांनी स्वखर्चाने शाळेचा चेहरामोहरा बदलला. ज्या शाळेकडे फिरकावेही वाटत नव्हते त्या शाळेत विद्यार्थी उत्साहाने येऊ लागले. रूपडं बदललेल्या शाळेत वर्गामधील कार्टुन, अभ्यासाची चित्रे, महापुरूषांचे फोटो कुतुहल निर्माण करणारे होते. या चार शिक्षकांनी केलेल्या कामाला तोड नाही. कुणीतरी पुढे आले पाहिजे, मदतीचा हात देणारे असंख्य तयार होतात. याचाच प्रत्यय पिंपळादेवीच्या शाळेमध्ये आला. या शाळेतील मुख्याध्यापक लक्ष्मीकांत खडकीकर बावीस वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.































































