आंदोलक कुस्तीपटूंनी भाकपच्या नेत्या वृंदा करात यांना स्टेजवरून खाली उतरवले, राजकीय मुद्दा न करण्याचे आवाहन

ऑलिम्पिकसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविणाऱ्या हिंदुस्थानी कुस्तीपटूंनी आता मनमानी कारभार करणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाविरोधातच दंड थोपटले आहेत. विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आशा ऑलिम्पियनसह देशातील अनेक अव्वल कुस्तीपटू राष्ट्रीय महासंघाच्या मनमानी कारभाराविरुद्ध दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलनासाठी बसले आहेत. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढत चालला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात या जंतर मंतर इथे पोहोचल्या होत्या. त्या कुस्तीपटू भाषण करत असलेल्या स्टेजवरही पोहोचल्या होत्या, मात्र त्यांना तिथून खाली उतरवण्यात आलं.

बजरंग पुनिया हा भाषण करत असताना वृंदा करात या त्यांच्या एका महिला सहकाऱ्यासोबत कुस्तीपटूंच्या मंचावर आल्या होत्या. यावेळीबजरंग पुनिया याने करात यांना उद्देशून म्हटले की तुमच्यापैकी कोणालाही माईक मिळणार नाही. यावर करात यांच्यासोबत असलेल्या महिलेने हातात एख बॅनर धरत कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न केला, यावर पुनिया याने करात आणि त्यांच्या महिला सहकाऱ्याला सांगितले की कृपया याचा राजकीय मुद्दा बनवू नका आणि तुम्ही मंचावरून खाली उतरून समोर उभ्या राहा.