
सामना ऑनलाईन, लंडन
मंगळवारी पावसाने न्यूझीलंड विरूद्ध हिंदुस्थान मुकाबल्यामध्ये व्यत्यय आणला होता. काल पावसामुळे अर्धवट राहिलेला सामना आज खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडमधल्या हवामान खात्याने मॅनचेस्टरमधील हवामानाचा अंदाज जाहीर केला असून आजही मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. मॅनचेस्टरमध्ये तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता (हिंदुस्थानात 3 वाजता) सामन्याला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तिथल्या वेळेनुसार 12 च्या सुमारास पावसाला सुरुवात होणार आहे. दुपारी 1 आणि 2 वाजता हवामान ढगाळ असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जेथे थांबला तेथून पुन्हा सुरू!
बुधवारी राखीव दिवसात लढतीचा उर्वरित खेळ होणार असून न्यूझीलंडचा संघ उरलेली 3.5 षटके फलंदाजी करील. त्यानंतर हिंदुस्थान संघ फलंदाजीला येईल. दोन देशांमधील लढत जिथे थांबलीय तिथूनच पुन्हा खेळवली जाईल. मँचेस्टर येथील उभय संघ खेळत असलेल्या खेळपट्टीवर याआधी लढत झाली नव्हती. त्यामुळे ही खेळपट्टी नवीकोरी होती. ती कोणता रंग दाखवील याचा अंदाज बांधणे कठीणच होते. तरीही केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार या जोडगोळीने सुरुवातीला गोलंदाजीचा ‘भन्नाट’ स्पेल टाकला. न्यूझीलंड फलंदाजांचा सावध पवित्रा, हिंदुस्थानी गोलंदाजांची प्रभावी कामगिरी व खेळपट्टीचा रागरंग या तीन कारणांमुळे पूर्वार्धात ‘दे दणादण’ फटकेबाजी बघायला मिळाली नाही. भुवनेश्वर कुमारच्या अन् डावातील पहिल्याच चेंडूवर मार्टीन गप्टील पायचीत होता होता वाचला. हिंदुस्थानने या वेळी ‘रिव्ह्यू’ गमावला. मात्र चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मार्टीन गप्टील एका धावेवर दुसऱया स्लिपमध्ये उभ्या विराट कोहलीकरवी झेलबाद झाला आणि न्यूझीलंडने पहिला बळी गमावला.

…अन् खेळ थांबला
न्यूझीलंडने 46. षटकांत 5 बाद 211 धावा केल्या असताना पावसाच्या व्यत्ययामुळे लढत थांबवण्यात आली. तेव्हा रॉस टेलर 67 धावांवर तर टॉम लॅथम तीन धावांवर खेळत होते. हार्दिक पांडय़ाने जेम्स निशामला 12 धावांवर तर भुवनेश्वर कुमारने कोलीन डी. ग्रॅण्डहोमला 16 धावांवर बाद केले. हिंदुस्थानकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांडय़ा, रवींद्र जाडेजा व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
पुन्हा चमकला
केन विल्यमसन याने वर्ल्ड कपमध्ये दिमाखदार कामगिरी केलीय. न्यूझीलंडने या लढतीआधीपर्यंत झळकावलेल्या एकूण धावांपैकी त्याने 31 टक्के धावा फटकावल्यात. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट कमी आहे. संपूर्ण संघाचा भार त्याच्या खांद्यावर आहे म्हणून असेल कदाचित. याही लढतीत त्याने चमकदार फलंदाजी करीत अर्धशतकी खेळी केली. किवींच्या कर्णधाराने 95 चेंडूंत सहा चौकारांसह 67 धावांची खेळी साकारली. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर तो रवींद्र जाडेजाकरवी झेलबाद झाला. या वेळी त्याने रॉस टेलरच्या साथीने 65 धावांची भागी केली.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड ः निकोल्स त्रि.गो. जाडेजा 28, विल्यमसन झे. जाडेजा गो. चहल 67, टेलर खेळत आहे 67, अवांतर ः 17, एकूण ः 46.1 षटकांत 5 बाद 211. गोलंदाजी ः भुवनेश्वर 8.1-1-30-1, बुमराह 8-1-25-1.
























































