
सामना ऑनलाईन । सेंट पीटर्सबर्ग
क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने इंग्लंडला हरवून पहिल्यांदाच फुटबॉल वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. लुका मॉड्रिचच्या संघाकडे आता ब्राझीलला जे शक्य झाले नाही ते करता येणार आहे. पहिल्यांदाच फायनलला येऊन ब्राझीललाही जिंकता आले नव्हते. क्रोएशियाकडे ती संधी असणार आहे. उरुग्वे, इटली, जर्मनी, इंग्लंड व फ्रान्स या पाचच संघांना पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन होता आले आहे. उरुग्वेने १९३० साली पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला होता. त्यानंतर इटलीने १९३४ साली, पश्चिम जर्मनीने १९५४ साली, इंग्लंडने १९६६ साली आणि फ्रान्सने १९९८ साली पहिल्यांदाच फायनलमध्ये जाऊन वर्ल्ड चॅम्पियनशिपवर नाव कोरले होते.
























































