क्रोएशियाच जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या दोन मिनिटांत गोल ठोकल्यामुळे तिसऱया स्थानासाठी असलेल्या सामन्यात गोलथरार पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. सामन्यात थरार ठासून भरला गेला, गोल ठोकण्यासाठी दोघांनी एकमेकांवर हल्ले चढवले, पण शेवटी क्रोएशियानेच आपली भूक भागवली. हाफटाइमला 2-1 ने आघाडीवर असलेल्या क्रोएशियाला दुसऱया सत्रात एकही गोल करता आला नाही. मात्र सामन्यावर आपलाच कब्जा ठेवला आणि फिफा वर्ल्ड कपचे कास्य जिंकून आपला आणि आपल्या लुका मॉद्रिचचा शेवट गोड केला. त्यांनी 1998 साली पदार्पणातच कास्य जिंकण्याची किमया साधली होती. आज पुन्हा तेच यश मिळविले.

आजचा तिसऱया क्रमांकासाठीचा सामनाही जोरदार झाला. क्रोएशिया आणि मोरोक्को दोघांनी अफलातून खेळाचे दर्शन घडवले. दोघेही शेवटपर्यंत जिंकण्यासाठी खेळले, सन्मानासाठी खेळले. क्रोएशियाने सामन्याच्या सातव्याच मिनिटाला गोल ठोकून आपली आघाडी घेतली. पेरिसिचने गोलपोस्टच्या जवळ केलेल्या पासला 20 वर्षीय योश्को गवारदिओलने अप्रतिम हेडरला गोलमध्ये बदलले आणि क्रोएशियाकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी वयात गोल ठोकण्याचा पराक्रम केला. पण या गोलला एक मिनिटही होत नाही तोच मोरोक्कोच्या झियेचच्या फ्री किकला अश्रफ दारीने गोलपोस्टपासून अवघ्या पाच यार्डावर गोलपोस्टमध्ये धाडले आणि आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल ठोकला. या गोलमुळे सामन्याचा थरार आणखी वाढला. दोन्ही संघांचे प्रतिहल्ले वाढले. आक्रमण वाढले. तितक्याच वेगात बचावही वाढला, पण गोलाचे लक्ष्य कोणालाही साधता येत नव्हते. तेव्हाच मार्को लिवायाच्या शॉटला मिस्लाव्ह ओरसिचने गोलमध्ये मारले आणि क्रोएशियाला पुन्हा आघाडी मिळवून दिली.

42 व्या मिनिटाला मिळालेल्या गोलशी बरोबरी साधण्यासाठी मोरोक्कोनेही खूप प्रयत्न केले, पण त्यांचे प्रयत्न आज यशस्वी ठरतच नव्हते. दुसऱया हाफमध्ये दोन्ही संघांनी कुठेही माघार घेतली नाही. त्यामुळे जोरदार संघर्ष शेवटपर्यंत पाहायला मिळाला. पूर्ण वेळ झाल्यानंतर 6 मिनिटांच्या जादा वेळेत मोरोक्कोने पुन्हा प्रयत्न केले, सामना क्रोएशियाच्या बाजूने संपणार तेव्हाच नसिरीने मारलेल्या हेडरने सर्वांचेच ठोके चुकवले. तो हेडर गोलपोस्टच्या तीन इंच वरून गेला आणि तिसऱया स्थानाचा संघर्ष क्रोएशियाने जिंकला.