
तुमच्या बँक खात्याची केवायसी अपडेट झालेली नाही. त्यामुळे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचे पँन नंबर अपडेट करा असे संदेश पाठवून लोकांची आर्थिक फसवणुक करणारा झारखंडमधील मुख्य भामटा अखेर माटुंगा पोलिसांच्या जाळ्यात आला. मंजित कुमार आर्या (वय – 31) असे त्याचे नाव असून तो जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याबरोबर तो लोकांना फसवायाचा धंदा पण करत होता.
केवायसी अपडेटच्या नावाने लोकांना शिताफिने आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या बँक खात्यावरच डल्ला मारण्याचे काम सायबर भामटे करत होते. माटूंगा येथे राहणारे वसंत छेडा (वय – 64) यांना केवारसी अपडेटचा मेसेज पाठवून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक खात्यातील 1 लाख 9 हजार 999 रुपये वळते करून त्या पैशातून दिल्लीतील एका दुकानातून मोबाईल खरेदी करण्यात आला होता. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून माटुंगा पोलीस ठाणे कलम 419, 420, 34 भा.द. वि.सह कलम 66 क, 66 ड अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिगंबर पगार तसेच संतोष पवार, मंगेश जऱ्हाड या पथकाने दिल्लीत जाऊन तिघा आरोपींना पकडले होते. त्या तिघांच्या चौकशीत या गुन्ह्यांचा मास्टर माईंड हा झारखंडच्या देवघर येथील बम बम बाबा काँलनीत राहणारा मंजित कुमार आर्या हा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पगार, पवार व जऱ्हाड या पथकाने झारखंड गाठून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या मंजितला पकडून मुंबईत आणले.
शिक्षकाच्या मोबाईलमध्ये हजारो बँक ग्राहकांचा डेटा
मंजितच्या फोनमध्ये अधिक तपास केला असता मोबाईलमध्ये एचडीएफसी व एसबीआय बँकेतील एकूण 70 हजार 650 इतक्या बँक ग्राहकांची गोपनीय माहिती मिळून आली तसेच आरोपीने त्याच्या फोन मधून 3600 व्यक्तींना फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेली लिंक एसएमएसद्वारे पाठविण्यात आल्याचे आढळून आले. सदर 70 हजार 650 ग्राहकांचा गोपनीय बँक डाटा कोठून लीक झाला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.































































