
फेसबुकवर महिलांशी मैत्री करून त्यांना चुना लावणाऱया नायजेरियनच्या साकीनाका पोलिसांनी मुसक्या आवळल्या. फुलगेन्स पुओडीओ ऊर्फ क्रिस्तोफर विल्मर असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार महिला या साकीनाका परिसरात राहतात. मार्च महिन्यात त्याना फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्याने स्वतःचे नाव डॉ. मार्प डोनाल्ड असे सांगून इंग्लंडमध्ये राहत असल्याच्या भुलथापा मारल्या. महिलेला दुसऱया दिवशी एक फोन आला. तुमचे गिफ्ट दिल्ली विमानतळावर आले आहे. ते हवे असल्यास कस्टम डय़ुटी भरावी लागेल असे सांगण्यात आले. महिलेने त्यावर विश्वास ठेवून सात खात्यांत 7 लाख 61 हजार रुपये भरले. पैसे भरल्यावर फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. फसवणूक झाल्याप्रकरणी महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली.
परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक किशोर सावंत यांच्या पथकातील सहायक निरीक्षक लीलाधर पाटील, महिला उपनिरीक्षक भोसले, संग्राम जगताप, भुवड, जगताप, राजभोज यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना एक बँक खात्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस त्या महिलेपर्यंत पोहचले. तेव्हा क्रिस्तोफरने त्या महिलेलादेखील महागडय़ा गिफ्टच्या नावाखाली चुना लावला होता असे तिने पोलिसांना सांगितले. तिलादेखील क्रिस्तोफरने बँकेचे डेबिट कार्ड आणि सीमकार्ड पाठवण्यास सांगितले होते. महिलेने विश्वास ठेवून कुरीअरने डेबिट कार्ड आणि सीमकार्ड पाठवले होते. त्या कुरीअरच्या पावतीवर क्रिस्तोफरच्या घरचा अर्धवट पत्ता होता. त्या पत्त्यावरून पुढे तपास सुरू केला. पोलिसांनी कुरीअर कंपनीकडून माहिती घेतली तेव्हा एक नंबर पोलिसांना मिळाला. त्या नंबरवरून साकीनाका पोलीस दिल्लीत पोहचले व दिल्ली पोलिसांच्या मदतीने क्रिस्तोफरच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांची 12 तास फिल्डिंग
क्रिस्तोफरला अटक करण्यासाठी साकीनाका पोलीस आठ दिवस दिल्लीत तळ ठोपून होते. पोलिसांनी क्रिस्तोफरचा नंबर काढला. पोलीस आपल्याला शोधत असल्याची माहिती त्याला मिळाली.
त्याने नंबर बंद केला होता. तेव्हा पोलिसांनी एकाची मदत घेतली. त्याला अटक करण्यासाठी गुरुवारी 12 तास फिल्डिंग लावून होते. रात्री अकराच्या सुमारास क्रिस्तोफरला अटक करून मुंबईत आणले.



























































