मुंबईचा डबेवाला देणार 10 रुपयांत पोटभर जेवण, विक्रोळीत अन्नवाटप केंद्र सुरू होणार

1821

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीबांना केवळ 10 रुपयांत पोटभर जेवण देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मुंबई डबेवाला असोसिएशनने पुढाकार घेतला असून त्यांच्या वतीने मुंबईत पहिले अन्नवाटप केंद्र  लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी गरजूंना 10 रुपयांत सकस आणि पोटभर जेवण दिले जाणार आहे. विक्रोळी टागोरनगर येथे दुपारी 12 ते 2 तर रात्री 7 ते 9 या वेळेत अन्नवाटप केले जाणार आहे.

वेळप्रसंगी तोटा सहन करू, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 10 रुपयांत पोटभर जेवण देण्याची घोषणा यशस्वी करून दाखवू, असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. या कामात विठ्ठल सावंत, दशरथ केदारी, कैलास शिंदे, अनंथा तळेकर या डबेवाल्यांनी पुढाकार घेतला आहे.

डॉ. पवन अग्रवाल यांनी दिली जागा

मुंबईच्या डबेवाल्यांवर पीएचडी करणार्‍या डॉ. पवन अग्रवाल यांनी आपली विक्रोळी टागोरनगर येथील प्रशस्त जागा अन्नवाटप केंद्रासाठी विनामूल्य दिली आहे. विक्रोळी विभागात किती ज्येष्ठ नागरिक आहेत, ते अन्नवाटप केंद्रापर्यंत येऊ शकतील का याची शहानिशा करून मग त्यांना थोडे शुल्क आकारून अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाईल, असेही तळेकर यांनी सांगितले. दरम्यान, विक्रोळी येथील जागेत काही आवश्यक बदल केले जात आहेत. ते बदल झाले की 15 दिवसांत या ठिकाणी अन्नवाटपाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या