दहिसरमध्ये फलक, बॅनर्समुळे वाहतूक बेटे विद्रूप

मुंबई महानगरपालिका शहरात ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ मोहीम राबवत असली तरी आर उत्तर विभागामध्ये येणाऱ्या मागाठाणे विधानसभा, दहिसर प्रभाग क्रमांक 4 आणि आर उत्तर विभागाच्या सर्व प्रभागांमध्ये लावण्यात आलेल्या फलक आणि बॅनर्समुळे वाहतूक बेटांचे विद्रूपीकरण झाले आहे. याबाबत वारंवार तक्रारी, पत्रव्यवहार करूनही महापालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दहिसरच्या सौंदर्यात भर पडावी आणि दहिसर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी माजी प्रभाग समिती अध्यक्ष, माजी नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी 297 बस स्टॉपसमोर करवीरनगर, मेक इन इंडिया, अशोकवन मारुती मंदिर, हनुमान टेकडी, पटेल समाज हॉलसमोर, 297 बस स्टॉप, भक्तीशक्ती संगम, कोकणीपाडा या विविध ठिकाणी गेल्या 4-5 वर्षांच्या कालावधीत सुशोभीकरण करून सुंदर व आकर्षक वाहतूक बेटांची निर्मिती केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या सर्व वाहतूक बेटांवर विविध राजकीय पक्षांच्या तसेच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठे-मोठे बॅनर, फलक लावून त्यांचे विद्रूपीकरण केले आहे.

याबाबत सत्कर्म माऊली प्रतिष्ठानचे सुधाकर गवस यांनी पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सहाय्यक आयुक्त नवनीश वेंगुर्लेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दहिसर पोलीस ठाणे, वाहतूक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल करून वाहतूक बेटांना विद्रूपीकरणाच्या जाळय़ातून मुक्त करावे, अशी मागणी केली आहे.