जगभरातील घडामोडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर जाणार

पाच वर्षांत 57 देशांचे दौरे केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. पुढील महिन्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात मोदी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2019 या काळात 57 देशांचे एकूण 92 दौरे केले, तर 2019 ते 2024 पर्यंत 28 देशांचे एकूण 43 देशांचे दौरे केले. मोदी हे सर्वात जास्त 8 वेळा अमेरिका दौऱ्यावर गेले.

थायलँडच्या नव्या पंतप्रधान शिनावात्रा

थायलँडच्या संसदेने पैतोंगतार्न शिनावात्रा यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली आहे. शिनावात्रा या देशाचा सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी थायलँडच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान श्रेथा थाविसीन यांना पदावरून हटवले होते. वडिलांशिवाय, त्यांची काकी यिंगलक यासुद्धा थायलँडच्या पंतप्रधान राहिलेल्या आहेत.

गुगलचे एआय ओव्हरव्ह्यू फिचर

गुगल कंपनीने हिंदुस्थानसह 6 देशांत एआय ओव्हरह्यू हे नवीन फिचर आणणार असल्याची घोषणा केली. हिंदुस्थानात इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत एआय ओव्हरह्यू सुरू करणार आहे. हिंदुस्थानसह यूके, जपान, इंडोनेशिया, मेक्सिको आणि ब्राझील या देशात हे फिचर सुरू केले जाणार आहे. हे फिचर आल्यानंतर गुगलच्या युजर्सला सर्च करण्यात मोठी मदत मिळू शकेल, असे कंपनीने म्हटले आहे.

इराणमध्ये हिजाब न घातल्याने पोलिसांनी महिलेवर गोळ्या झाडल्या

इराणमध्ये हिजाब न घातल्याने एका महिलेला पोलिसांनी गोळ्या घातल्या. आरेजू बद्री असे या पीडित महिलेचे नाव आहे. ही महिला 31 वर्षांची असून तिला दोन छोटी मुले आहेत. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिजाब न घालण्याबाबत पोलिसांनी आपल्या जबानीत कोणताही उल्लेख केलेला नाही. इराणमध्ये हिजाब न घालणे हा सर्वात गंभीर गुन्हा बनला आहे.

‘स्त्री 2’ची जबरदस्त ओपनिंग

श्रद्धा कपूर हिच्या बहुचर्चित ‘स्त्री 2’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाने अक्षरशः बॉक्स ऑफिस झपाटले आहे. 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 55.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवत या वर्षी सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे, तर प्रीह्यू शो मिळून 65 कोटींची कमाई केली आहे.

पाकिस्तानात 7 दहशतवादी ठार

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या गोळीबारात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चे सात दहशतवादी ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पाकिस्तानी सैन्याच्या ‘इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशंस’ने एका पत्रकार परिषदेत दिली.

‘नवरा माझा…2’चा धमाकेदार टीझर

‘नवरा माझा नवसाचा-2’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात हेमल इंगळे आणि स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव भेटीला येणार आहेत.