रायगडात ९२ गावे, ३०३ वाड्यांच्या घशाला कोरड; धरणांनी तळ गाठला, टँकरवर झुंबड, पाऊस लांबल्यास पाणीटंचाई वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जूनचा पंधरवडा उलटला तरी अद्याप पाऊस सुरू न झाल्याने रायगड जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रायगडातील ९२ गावे व ३०३ वाड्यांच्या घशाला कोरड पडली असून सुमारे दीड लाख ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या ठिकाणी ७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून पाण्याचा टँकर गावपाड्यांवर येताच ग्रामस्थांची अक्षरशः झुंबड उडत आहे. पाऊस आणखी लांबला तर पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून जलसाठे मात्र कमी आहेत. त्याशिवाय धरणातील पाण्याची पातळीदेखील कमी होत चालल्याने पाणीटंचाईची समस्या वाढत चालली आहे. अनेक गावांतील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना कोसो दूर पायपीट करावी लागत आहे. अनेक गावांत तर पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे तेथे पाणी भरण्यासाठी महिलांच्या रांगा लागत आहेत. जेथे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही तेथे जनावरांना पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे

पाण्यासाठी होतात भांडणे
गावात पाण्याचे टैंकर येताच पाणी भरण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत आहे. पाणी भरण्यावरून बाद, भांडणेही होत आहेत. ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्यांना दिलासा मिळत असला तरी पाऊस वेळेवर पडला नाही तर आगामी काळात जिल्ह्यातील आणखी बऱ्याच गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.

  • रायगड जिल्ह्यातील ९२ गावे, ३०३ वाड्या अशा एकूण ३९५ ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
  • टँकरवरच टंचाईग्रस्त गावांची मदार अवलंबून आहे. अजून पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे टैंकरग्रस्त गार्बामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
  • रायगड जिल्ह्यात मार्चपासूनच पाण्याची समस्या सुरू झाली आहे. आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे.
  • जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बीस लिटर पाणी ५० ते ६० रुपयांनी विकले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.