
सामना ऑनलाईन । चंद्रपुर
आरोग्यास अपायकारक असलेली नकली बर्फी आणून त्याचा गोरखधंदा करणाऱ्या रॅकेटला रविवारी मोठा दणका देण्यात आला. स्थानिक अन्न व औषध विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल 268 किलो नकली बर्फी जप्त करण्यात आली. शहरातील सपना टॉकीजजवळ एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकली बर्फीचा साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाहणी केली असता डीएनआर कुरीअर ऑफिससमोर असलेल्या एका गोदमाबाहेर ही बर्फी असल्याचे निदर्शनास आले. ही बर्फी उघड्यावरच ठेवण्यात आली होती. चौकशी केली असता पुरवठादाराकडे अन्न व औषध विभागाचा परवानाही नव्हता. हा माल सावलराम झोइताराम चौधरी याचा असून त्याने हा माल गुजरातमधून मागविल्याचे सांगितले. पथकांने तब्बल 268 केली नकली बर्फी जप्त केली असून अन्न सुरक्षा कायदा 2006 नुसार कारवाई केली आहे. जप्त केलेला माल नष्ट केला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

































































