
दापोली तालुक्यात वाळू उपशाचा व वाहतूकीचा ‘रात्रीस खेळ चाले’ हा प्रकार सध्या जोरदार सुरू आहे. वाळू चोरीसारखा गंभीर प्रकार तालुक्यात होत असतानाही महसुल प्रशासन मात्र माहीत असतानाही या प्रकाराकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे वाळू चोरीच्या या प्रकाराचा थेट परिणाम हा राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलावर होत आहे.
चिपळूण तालुक्यातील करंबवणे खाडी गटात हातपाटीव्दारे वाळू काढण्याची रॉयल्टी भरून करंबवणे येथून वाळू उपसा केलेली वाळू ही दापोली तालुक्यातील पांगारी तर्फे हवेली येथील सर्व्हे नंबर 111/4 तसेच सर्व्हे नंबर 109 या ठिकाणी 2100 चौरस क्षेत्रात ती साठविण्यासाठी आणली जाते. मात्र हा सोपस्कार केवळ कागदी घोडे नाचविण्यापुरताच दाखविला गेला आहे. कारण चिपळूण तालुक्यातील करंबवणे येथून वाळू उपसा केलेली वाळू साठविण्यासाठी दापोली तालुक्यातील पांगारी तर्फे हवेलीत किती ब्रास आणली जाते.
यापेक्षा खुःद दापोली तालुक्यातील पांगारी तर्फे हवेली गावाच्या हद्दीतील खाडीतच सक्शनपंपाव्दारे वाळू काढली जात आहे. हे दापोली महसुल प्रशासनाला माहीत असूनही त्यावर अजिबातच कारवाईचा बडगा उचलला जात नाही. महसुल प्रशासन वाळू चोरीसारख्या गंभीर आणि शासनाचा महसुल बुडविणाऱ्या या प्रकाराकडे कोणाच्या दबावामुळे की काही पदरात पडणाऱ्या मोबदल्याच्या प्रकारामुळे महसुल प्रशासन दुर्लक्ष करीत आहे आहे. याची आता खरी तर कोकण आयुक्तांकडूनच चौकशी होणे गरजेचे आहे त्यातुनच सत्य बाहेर पडेल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
पांगारी खाडीत राजरोसपणे खाडीत सक्शन पंप व ड्रेझरद्वारे वाळू उपसा केला जात असताना येथील एक गावपुढारी आपले कोणीही बिघडऊ शकत नाही या अविर्भावात वावरत आहे. प्रत्येकी ब्रास मागे एक हजार रुपये हा गावपुढारी वसुल करत असल्याची खुलेआम चर्चा सुरु आहे. यापूर्वी शिरवणे,गोविंदशेत याठिकाणीही वाळू उपसा सुरू होता मात्र तुर्तास हे दोन स्पॉट बंद करण्यात आले आहेत. खाडीतुन वाळू आणण्यासाठी मोठी बार्ज असून त्या ठिकाणी क्रेन पण तैनात करण्यात आली आहे.
जेटीही वाढविण्यात आली असून काढलेली वाळू ही रात्रीच्या अंधारात डंपर वाहतूकीव्दारे सुरू असते इतके सगळे होऊनही महसूल यंत्रणा याकडे दुर्लक्ष का करत आहे ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.या सगळया प्रकाराकडे महसुल अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे. या परिसरात कार्यरत असणारे महसूल विभागाचे मंडल अधिकारी यांचे या प्रकाराला अभय आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. तसेच वाळूचे दरही आवाच्यासवा करण्यात आले असून तब्बल 5 ते 6 हजार रुपये प्रती ब्रास या दराने वाळू विक्री होत आहे.
सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे दर गेल्याने साधे बांधकाम करणेही सामान्य माणसाला जिकरीचे झाले आहे. वाळू वाहतुकीच्या रात्रीस खेळ चालू या प्रकाराला पोलिसांचाही या वाळू वाहतुकीला आशीर्वाद आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही डंपर तर अतिशय भरधाव वेगाने पळविले जातात. अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.




























































