
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरात राहणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे समोर आले आहे. मुंबई, पुण्यातील काही पालकांच्या मोबाईलवर एका दूरध्वनी क्रमांकावरून ‘मेरिटनेशन’ कोचिंग क्लासचालकांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. या क्लासचालकांना विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, शाळेचे नाव, विद्यार्थी शिकत असलेली इयत्ता आदी माहिती तोंडपाठ असून ते पालकांना पाल्याला कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन करीत आहेत. एसएमएस आणि दूरध्वनी करून सुरू असलेल्या क्लासवाल्यांच्या या जाहिरातबाजीला पालक मात्र त्रासले आहेत.
022-68170051 या दूरध्वनी क्रमांकावरून काही पालकांच्या मोबाईलवर फोन आले आहेत. ‘मेरिटनेशन’ कोचिंग क्लासच्या वतीने या क्रमांकावरून पालकांशी संपर्क साधला जात आहे. मुंबईतील काही नामांकित शाळांच्या पालकांना आज दिवसभरात असे कॉल्स आले. पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनवरून मेरिटनेशन ऑनलाइन टय़ूशनची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या क्लासवाल्यांकडे विद्यार्थ्यांची असलेली माहिती ऐकून पालक चक्रावले. काही पालकांनी आमच्या मुलांची माहिती तुम्हाला कुठून मिळाली अशी विचारणा फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीकडे केली, मात्र त्या व्यक्तीकडून याविषयी कोणतेच उत्तर पालकांना मिळाले नाही.
विद्यार्थ्यांचा डाटा लीक होतोच कसा?
विद्यार्थ्यांचा डाटा लीक झाल्याप्रकरणी इंडिया वाईड पॅरेंटस् असोसिएशनने चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचा आधारक्रमांकही लीक होऊ देऊ नये, असे सरकारचे आदेश असतानाही विद्यार्थ्यांचा डाटा लीक होतोच कसा, असा सवालही पालकांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी पॅरेंटस् असोसिएशन शालेय शिक्षणमंत्र्यांकडे तसेच पोलिसांकडे तक्रार करणार आहे.
बालहक्क आयोगाकडेही तक्रार
कोचिंग क्लासचालकांना शालेय विद्यार्थ्यांची माहिती कुठून मिळते हा संशोधनाचा विषय आहे. एकतर शाळा या क्लासवाल्यांना माहिती पुरवत असेल किंवा शाळेच्या मोबाईल ऍप्सवरून विद्यार्थ्यांची माहिती कोचिंग क्लासवाले घेत असतील. पण हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. विद्यार्थी अथवा पालकांच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती क्लासवाल्यांच्या हाती लागणे चुकीचे असून या प्रकरणी बालहक्क आयोगाकडेसुद्धा तक्रार करणार आहे- अनुभा सहाय, अध्यक्ष, इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशन.
‘नंबर नॉट इन सर्व्हिस’
पालकांना ज्या दूरध्वनी क्रमांकावरून फोन आला होता त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ‘नंबर नॉट इन सर्व्हिस’ असा मेसेज मिळत आहे. तसेच मेरिटनेशच्या वेबसाईटवर मुंबई कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध नाही. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या दिल्ली कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
काय आहे मेरिटनेशन…
- मेरिटनेशन ही खासगी टय़ूशनची ऑनलाईन सेवा आहे.
- पहिलीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन केले जाते असा दावा http://www.meritnation.com वर करण्यात आला आहे.
- सीबीएसई, आयसीएसई, आयएससीसह विविध राज्यांतील अभ्यासक्रमांचे ऑनलाइन धडे येथे दिले जातात.
- नीट, आयआयटी जेईई प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शनही केले जाते.
- वेबसाइटवर उपलब्ध फीच्या आकडय़ानुसार कमीत कमी 4 हजार 200 ते जास्तीत जास्त 32 हजार रुपये विविध अभ्यासक्रमांसाठी घेतले जातात.





























































