
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
देशाच्या संरक्षण खात्यातील विविध विकास कामांपोटी ठेकेदारांची तब्बल सोळाशे कोटी रुपयांची बिले थकली आहे. ही थकीत बिले तात्काळ मिळावी. या मागणीसाठी एमईएस बिल्डर असोसिएशन इंडियाच्या नाशिक विभागातील संभाजीनगर शाखेच्या ठेकेदारांनी काम बंद करून छावणीच्या सहायक दुर्ग अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या थकबाकीत संभाजीनगर छावणीच्या सुमारे दीड कोटी रुपयांच्या बिलांचा समावेश आहे.
देशाच्या सरंक्षण खात्यांतर्गत विविध विकास कामे कंत्राटदारांकडून करण्यात येतात. या कंत्राटदारांकडून देशभरातील विविध छावणी बोर्डांनी सुमारे १ हजार ६०० कोटी रुपयांची कामे करून घेतली आहेत. या विकास कामांची देयके एक ते दीड वर्षापासून मिळत नसल्याने ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बिले मिळावीत म्हणून संरक्षण मंत्री निर्मला सीताराम यांची भेट घेऊन दिवाळीपूर्वी बिले अदा करावीत अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला होता. त्यावर 30 ऑक्टोबरपर्यंत बिले अदा करण्याचे आश्वासन संरक्षण मंत्री निर्मला सीताराम यांनी दिल्यानंतर काम बंदचा निर्णय मागे घेण्यात आला होता.
मात्र अद्याप ही कंत्राटदारांची बिले देण्यासंदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संभाजीनगर येथे ठेकेदारांनी काम बंद करून सहायक अभियंता कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी एमईएस बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक विभागातील संभाजीनगर शाखेचे अजय दीक्षित, डॅनिश मॅथ्यू, एन.आर. सिंग, अमीर शरीफ, शमीम खान, राहुल सिंग, अरुण पाटील आदींनी सहायक अभियंता आनंद सिंग यांना मागण्यांचे निवेदन दिले.
निधी कमी प्रमाणात उपलब्ध
दरम्यान, वर्षभरापासून दर तीन महिन्याला संरक्षण विभागातून मिळणारा निधी कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले काही प्रमाणात थकली आहेत. त्यांनी केलेल्या मागणीचे निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती संबंधित अभियंत्यांनी दिली.



























































