
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन बंगालच्या खाडीत कमळ फुलविण्याच्या दिल्लीश्वरांच्या प्रयत्नांवर सध्या तरी पाणी फेरले गेले आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने बंगालवर नजर ठेवली आहे, मात्र ममतादीदींच्या झंझावाती कारभारापुढे आतापर्यंत तरी भाजपची डाळ शिजलेली नाही. गांगुलीच्या ‘नो’ मुळे भाजपची अडचण होणार असली, तरी गांगुलीच्या ‘गुगली’वर भाजपची ‘हिटविकेट’ गेली आहे. प. बंगालच्या निवडणुकीचा बिगुल यानिमित्ताने फुंकला गेला आहे, असेच मानावे लागेल.
बिहार विधानसभा निवडणुकीचा धुरळा अजून खाली बसत नाही तोच दिल्लीश्वर भाजपाईंना बंगालच्या सत्तेची स्वप्ने पडायला सुरुवात झाली आहे. प्रयत्न करूनही पश्चिम बंगालमध्ये भाजपला आपला जम आजपर्यंत बसवता आलेला नाही. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना भाजप मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची पुडी कुणीतरी दिल्लीतून सोडली. गांगुली यांचे भाजप सरकारच्या कार्यकाळात वाढलेले क्रिकेटमधले ‘प्रस्थ’ लक्षात घेता ते भाजपच्या वतीने बंगालच्या पीचवर बॅटिंग करणार काय, असा सवाल विचारला जात होता. शंकेलाही जागा होतीच, मात्र प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘दादा’ने यातील हवा काढून टाकत राजकारणात जाण्याचा व मुख्यमंत्री होण्याचा आपला कोणताही इरादा नसल्याचे सांगितले.
माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन बंगालच्या खाडीत कमळ फुलविण्याच्या दिल्लीश्वरांच्या प्रयत्नांवर सध्या तरी पाणी फेरले गेले आहे. 2024ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने बंगालवर नजर ठेवली आहे, मात्र ममतादीदींच्या झंझावाती कारभारापुढे आतापर्यंत तरी भाजपची डाळ शिजलेली नाही. गांगुलीच्या ‘नो’ मुळे भाजपची अडचण होणार असली तरी बंगालच्या निवडणुकीचा बिगुल यानिमित्ताने फुंकला गेला आहे असेच मानावे लागेल.
नटनटय़ा आणि ‘स्टारडम’ असलेल्या मंडळींना राजकारणात चमकविण्याचे श्रेय निसंशय भाजपला द्यावे लागेल. त्यातून हल्ली अनेक ‘नवदेशभक्त’ मंडळी उदयाला आली आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपला जनाधार नाही अशा ठिकाणी भाजप अशा स्टारडम मंडळींना पुढे करून ‘बेस’ बनविण्याचा प्रयत्न करत आहे. प. बंगालमध्ये भाजपने सौरव गांगुलीभोवती अशीच तगडी ‘फिल्डिंग’ लावली होती, मात्र तो चेंडू मैदानाबाहेर टोलावून गांगुलीने आपणच खरे ‘बंगालचे दादा’ असल्याचे दाखवून दिले आहे व विषयाला तूर्तास पूर्णविराम दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बंगाल जिंकणे भाजपला खूप महत्त्वाचे आहे. त्याच दृष्टीने तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडून गेले काही वर्षे बंगालमध्ये भाजपने ‘आयाती’चे ठोक राजकारण सुरू केले आहे. ममतादीदींचे खासम्खास माजी रेल्वेमंत्री मुकुल राय यांना सारदा घोटाळ्याच्या चौकशीची भीती दाखवून त्यांच्या हाती कमळ देण्यात आले आहे. आता ममतांच्या सरकारमधील एक मंत्री शुभेंदू अधिकारी आपल्या कुटुंबकबिल्यासह तृणमूल सोडतील अशी स्थिती आहे. शुभेंदू यांचे बंधू शिशिर अधिकारी खासदार व त्यांचा मुलगा दिव्येंदुही खासदार आहेत. ही सगळी अधिकारी मंडळी ममतांपासून बाजूला जात भाजपमध्ये सामील होतील अशी चिन्हे आहेत. 2011 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हेच दिब्येंदू अधिकारी सिंगूर व नंद्रीग्रामच्या शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते होते. त्याची बक्षिसी म्हणून ममतादीदींनी त्यांना मंत्री बनवले, मात्र आता त्यांचेही नाव नारदा स्टिंग ऑपरेशनमध्ये असल्याने चौकशी यंत्रणांचे भुंगे मागे लागल्याने नाइलाजाने का होईना हाती कमळ घ्यावे लागेल अशी स्थिती आहे. तृणमूलमधून वाजतगाजत भाजपमध्ये दाखल झालेले मुकुल राय सध्या अडगळीत पडले आहेत. राज्यसभा व मंत्रीपद तर दूर केवळ राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर त्यांची बोळवण करण्यात आलेली आहे. मुकुल राय यांची झालेली ही अवस्था पाहून धडाकेबाज सौरव गांगुलीने आपण भले आणि आपले क्रिकेट भले असा विचारी निर्णय घेतला असावा. ममतांसारख्या धडाकेबाज नेतृत्वाला टक्कर द्यायची तर तसाच तोडीचा चेहरा असायला हवा. भाजप भिंग घेऊन या चेहऱयाच्या शोधात आहे. गांगुलीच्या नकारामुळे आता नव्या उमेदवाराची शोधमोहीम भाजपला घ्यावी लागेल हे निश्चित!
आश्वासनांची गाजरे
लोकशाही निवडणूक प्रकियेत जनतेला आश्वासने वगैरे ही द्यायचीच असतात, पण ती पटतील आणि पचतील अशी असावीत. मात्र सध्या देशात वाट्टेल ते ‘फेकायची’ जी काही परंपरा निर्माण झाली ती बिहार विधानसभा निवडणुकीने इमानइतबारे पाळली आहे. आकडेवारीच्या फेकाफेकीत तर मोदी सरकारचा जगात कोणी हात धरू शकणार नाही. दोन कोटी बेरोजगारांना प्रतिवर्षी रोजगार देणारच, असे आश्वासन देणाऱया मोदी सरकारने त्यानंतर याच बेरोजगार युवकांना कढया झारे हातात घेऊन पकोडे तळा आणि ‘आत्मनिर्भर’ व्हा असा सल्ला दिला होता. आता निवडणूक बिहारमध्ये असल्यामुळे कोसी नदीच्या पुरापेक्षाही प्रचंड व महाभयंकर अशी आश्वासने देऊन सत्ताधाऱयांसह विरोधकांनी जनतेच्या भावनांशी खेळ केला आहे. आम्हाला निवडून दिले तरच मोफत कोरोनाची लस टोचू, असे लोकांच्या जीवनमरणाशी खेळ करणारे आश्वासन ताजे असतानाच बिहारमध्ये 19 लाख बेरोजगारांना रोजगार देण्याचेही भाजपने ठोकून दिले होते. त्यापूर्वी तेजस्वी यादवांनी 10 लाख जणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र 19 लाख रोजगारांचे आश्वासन देणाऱया भाजपला 10 लाखांच्या तेजस्वी आश्वासनावर आक्षेप होता. इतक्या नोकऱया द्यायच्या तर 80 हजार कोटींची तरतूद करावी लागेल, असा दावा उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला होता. भाजपचे आश्वासन अमलात आणायचे ठरवले तर दीडेक हजार कोटी त्यावरच खर्च होतील. बिहारसारख्या गरीब राज्याचे बजेटच 13 हजार कोटींच्या आसपास आहे. अशा राज्यांना ही आश्वासनांची गाजरे परवडतील काय?
‘स्लिप ऑफ टंग’ म्हणजे काय रे भाऊ?
राजकारणात सध्या अनेक नेत्यांनी बेताल धरला असला, तरी काही वेळा हा बेताल जाणीवपूर्वक तर धरलेला नाही ना, अशी शंका निर्माण व्हावी,अशी स्थिती सध्या अनेक ठिकाणी दिसून येत आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभा पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री कमलनाथांनी ‘आयटम’ म्हटल्याने काँग्रेसला त्याचा फटका बसेल असे चित्र असतानाच भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी चक्क काँग्रेसलाच मतदान करा, असे आवाहन जनतेला केले. त्यामुळे चांगलीच खसखस निर्माण झाली आहे. गमतीचा भाग म्हणजे दोनेक वर्षांपूर्वी ज्या उमेदवारांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली ते सध्या कमळ हातात घेऊन नाचत आहेत तर ज्यांनी कमळावर निवडणूक लढवली त्यांच्या हातात काँग्रेसचा ‘हात’ आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारात पक्षाने डावलले म्हणून ज्योतिरादित्य सुरुवातीला खट्टू झाले होते. निवडणूक प्रचारातही पोस्टरवर त्यांचा फोटो केवळ औपचारिकता म्हणून अंडाकृती पद्धतीने लावला गेला. काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या नंतर ज्योतिरादित्य यांना मानसन्मान मिळत असे. भाजपमध्ये आल्यानंतर ‘शुभेच्छुकांच्या श्रेणी’त त्यांचे फोटो लावल्याने ते नाराज झाले. आपली दर्दे दिल ‘मन की बात’ त्यांनी काही पत्रकारांना ऐकवलीही. एकीकडे मंत्रीपदाचे गाजर अजून हातात नाही आणि भाजपमधील दुय्यम वागणूक यामुळे वैतागून तर ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले नसेल ना, असा ‘शंकापूर’ सध्या मध्य प्रदेशातून वाहतो आहे. शिंदे यांचा संघर्ष कमलनाथ व दिग्विजय सिंग यांच्याशी आहे. त्यामुळे अल्पावधीत भाजपमध्ये ‘फ्रस्ट्रेट’ झालेले ज्योतिरादित्य भविष्यात काय करतील हे निवडणूक निकालानंतरच कळेल. पण खरेच ही ‘स्लिप आफ टंग होती काय रे भाऊ?’, असाच सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.

























































