
देशातील ऑक्सिजन तुटवडय़ावर दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी अत्यंत कठोर भूमिका घेतली. ऑक्सिजन पुरवठय़ामध्ये जर कोणी आडकाठी आणली, तर आम्ही त्याला थेट फासावर लटकवू, मग तो अधिकारी केंद्र सरकारचा असो किंवा राज्य सरकार वा स्थानिक प्रशासनातील. कुणाचीही गय केली जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी दिला.
राजधानी दिल्लीतील महाराज अग्रसेन हॉस्पिटलच्या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन शिल्लक नसल्याचे म्हणणे अग्रसेन हॉस्पिटलने मांडले. देशभरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही कोरोनाची लाट नसून ‘त्सुनामी’ आहे. आयआयटी दिल्लीच्या म्हणण्यानुसार मे महिन्याच्या मध्यावर कोरोनाचा ‘पीक अवर’ असेल. त्यादृष्टीने तुम्ही काय तयारी केली आहे, अशी विचारणाही न्यायालयाने सरकारला केली.




























































