दिल्लीत आपातकालीन परिस्थिती, शाळा एक आठवड्यासाठी बंद; सरकारी कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind_kejriwal

राजधानी दिल्लीतील वायूप्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वाढत्या वायूप्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आम आदामी पक्षाने शनिवारी आपातकालीन बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये दिल्लीतील सर्व शाळा सोमवार 15 नोव्हेंबरपासून एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केरजीवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली.

आपातकालीन बैठकीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, पर्यावरण मंत्री गोपाल राय आणि दिल्लीचे मुख्य सचिव उपस्थित होते. या बैठकीमध्ये चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील सर्व शाळा एक आठवड्यांसाठी बंद करण्यात येत आहेत. तसेच सरकारी कार्यालयेही बंद राहणार असून कर्मचारी वर्कफ्रॉम होम अर्थात घरी बसून काम करतील. खासगी संस्था आणि कार्यालयांनीही शक्य तेवढ्या कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होमचा पर्याय द्यावा, असेही केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल पुढे म्हणाले की, आम्ही दिल्लीत लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहोत. तसेच प्रदुषणाचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत एक प्रस्ताव बनवत असून सर्वांना विश्वासात घेऊन सर्वोच्च न्यायालयात याबाबत माहिती देऊ. आपण सर्वांनीच समस्यांचा सामना केला असून हा सर्वांच्याच आरोग्याचा प्रश्न आहे. तसेच दिल्लीतील जनता समजुतदारपणा दाखवून सरकार जे पाऊल उचलेल ते मान्य करेल अशी मला आशा आहे, असेही केजरीवाल म्हणाले.