
दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह ईनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराच्या दबावामुळे 14 वेळा गर्भपात कराव्या लागलेल्या 33 वर्षीय तरुणीने अखेर मृत्युला कवटाळले आहे. दक्षिणपूर्व दिल्लीतील जैतपूर भागामध्ये 5 जुलै रोजी हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी तरुणीच्या घरामध्ये एक सुसाईड नोटही सापडली आहे. यातून ती एका पुरुषासोबत लिव्ह ईनमध्ये रहात असल्याचे समोर आले असून लग्नाचे अमिष दाखवून त्याने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवल्याचेही स्पष्ट झाले आहे. लिव्ह ईनमधील व्यक्तीने लग्न करण्यास नकार दिल्याने आत्महत्या करण्यावाचून कोणताच पर्याय आपल्यापुढे नसल्याचे पीडितेने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
5 जुलै रोजी जैतपूर येथील एका तरुणीने आत्महत्या केल्याचा पीसीआर कॉल पोलिसांना आला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीडितेने गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. सदर तरुणाने पीडितेला आत्महत्येसाठी मजबूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दक्षिणपूर्व दिल्लीच्या डीसीपी ईशा पांडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पीसीआरवरून कॉल आल्यानंतर पोलिसांचे एक पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पीडितेने गळफास घेतला होता. पोलिसांनी तत्काळ तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल केला, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनास्थळावरून पीडितेचा मोबाईल आणि फाशी घेण्यासाठी वापरलेला दोरही जप्त केला आहे. प्राथमिक दृष्ट्या पीडिता गेल्या सात ते आठ वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत असल्याचे समोर आले आहे. ती एका तरुणासोबत लिव्ह ईनमध्ये रहात होती. त्याच्यापासून ती अनेकदा गर्भवतीही राहिली होती. मात्र प्रियकराच्या दबावामुळे तब्बल 14 वेळा तिने गर्भपात केला होता.



























































