दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री, बार्शीतील धानोरे येथे सोयाबीनची पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील इतर भागांप्रमाणेच सोलापूर जिल्ह्याततील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांना थेट मदत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज बार्शी तालुक्यातील धानोरे येथे नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जि. प. अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सीईओ कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, तहसीलदार एफ. आर. शेख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातत पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातत सरासरीच्या सुमारे 50 टक्केच पाऊस झाला असून, खरिपाच्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. धानोरेसह बार्शी तालुक्याच्या यापरिसरात सुमारे 90 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे 100 टक्के नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीकडे शासन गांभीर्याने लक्ष देत असून, शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी लवकरच जीआर काढण्यात येईल.

पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, अन्नधान्य तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा प्रश्न याबाबतही शासन निर्णय घेणार आहे. रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले, तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उजनी धरणातील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याबाबतही शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘फ्लड डायव्हर्शन’च्या माध्यमातून उजनी धरणात पाणी आणण्याच्या प्रस्तावावरही कार्यवाही सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
शेतकरी दमयंती गादेकर, संध्या गरड, वंदना गादेकर, राहुल पाटील यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर पावसाअभावी झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीबाबत व्यथा मांडल्या. तसेच शासनाकडून त्वरित मदत मिळावी, अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांना धीर देत, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, लवकर मदत दिली जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.