
पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच इंधन दरवाढीचा सपाटा सुरू झाला. गेल्या आठ दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर तीन वेळा वाढले असून राज्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. इंधन टंचाईच्या भीतीने ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर ड्रम, कॅन, बाटल्या घेऊन रांगा लागल्या आहेत. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी करत असल्याचे दिसून आले असून यातून वादाचीही ठिणगी पडत आहे. काही ठिकाणी शेतकरी आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाद आणि हाणामारी झाल्याचेही दिसून आले. डिझेल मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला असताना आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून काहीतरी गडबड असल्याची शक्यता वर्तवली आहे. ते शिर्डी येथे माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील इंधन टंचाईबाबत आणि पेट्रोल पंपावर लागलेल्या रांगांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना जे काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या अशा सूचना कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना केल्या आहेत. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागामध्ये अचानक 20-30 टक्क्यांनी पेट्रोल-डिझेलची मागणी वाढल्याचे दिसते.
मुख्यमंत्री म्हणतात… इंधन तुटवडा ही अफवा…पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका
दरवर्षी किती पेट्रोल आणि डिझेल लागते याची माहिती आपल्याकडे आहे. त्यात जर अचानक 20-30 टक्के वाढत असेल तर काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीने काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितले आहे. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बूक बघून त्यांना डिझेल देणे सुरू केले आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.






























































