
देवगड जामसंडे न.पं.सभेत कचरा प्रश्नावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक होवून त्यांनी नगराध्यक्षांना धारेवर धरले परंतु नगराध्यक्षांची बाजू लावून धरत सत्ताधारी नगरसेवकांनी विरोधकांनाही प्रत्युत्तर दिल्याने जामसंडे न.पं.ची मासिक सर्वसाधारण सभा कचरा प्रश्नावरून चांगलीच गाजली. सलग दोन वर्षे सत्ताधारी नगरसेवकांनी नगरोत्थानमधून सुचविलेली विकासकामे वगळण्यात आली असा आरोप करीत सत्ताधारी नगरसेवक नितीन बांदेकर व बुवा तारी यांनी या विषयाप्रकरणी प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा सभेत दिला.
देवगड जामसंडे न.पं.ची मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा मीताली सावंत, मुख्याधिकारी सुरज कांबळे, सभापती संतोष तारी, बांधकाम सभापती तेजस मामघाडी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच विरोधकांनी कचरा विषयावरून आक्रमक होवून नगराध्यक्षांना चांगलेच धारेवर धरले. दाभोळे येथे करारावर घेतलेल्या जागेत कचरा विलगीकरण न करता तसाच टाकला जात आहे असा आरोप करीत अटी शर्तीचे पालन न केल्यामुळे दाभोळे ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला रद्द केला. असे असताना नगराध्यक्षांनी गेल्या सभेत चुकीची माहीती का दिली असा सवाल करीत विरोधकांनी नगराध्यक्षांना धारेवर धरले.
यावेळी नगरसेवक बुवा तारी यांनी मागणी केल्यानुसार कचरा आंबा बागायतदार घेवून जात आहेत. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहे. सत्तेत असताना टेंबवली येथे कचरा डंपींगसाठी खरेदी केलेल्या 22 गुंठे जागेचे काय केलेत? गावाचा वविरोध असताना त्यावेळी जागा का खरेदी केली असा सवाल करीत बुवा तारी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर केले. यामुळे कचरा विषयावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोपावरून सभा गाजली.
दोन वर्षे सत्ताधारी नगरसेवकांनी जिल्हा वार्षिक नगरोत्थानमधून सुचविलेली कामे व त्या अनुषंगाने कामांचा पाठविलेल्या आराखड्यातील ठराविक नगरसेवकांचीच कामे मंजुर होवून आली मात्र सत्ताधारी नगरसेवकांची कामे मंजुर होवून आली नाहीत. न.पं.कडून ओरोस येथे कामांचा आराखडा गेल्यानंतर सत्ताधाऱ्यांचीच कामे वगळली जात आहेत, असा आरोप नगरसेवक नितीन बांदेकर व बुवा तारी यांनी केला.या विषयी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी सभागृहात दिला. देवगड जामसंडे नळपाणी पुरवठा योजना देखभाल दुरूस्ती करणे या कामास मुदतवाढ देणे या विषयावर झालेल्या चर्चेवेळी संबंधित ठेकेदारांनी चार वर्षे सहा महिन्याचे आपले 52 लाख रूपये अदा करण्यात आले नाही असे पत्र मुख्याधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती सभागृहात प्रशासनाकडून देण्यात आली.
देवगड जामसंडे न.पं.हद्दीतील प्रस्तावित विकास कामांसाठी सीआरझेड ना हरकत दाखले यासाठी एजन्सी नेमणुक करण्यात यावी या विषयावर झालेल्या चर्चेत भाजपा गटनेते शरद ठुकरूल यांनी घरबांधणी करणाऱ्या घरमालकांनाही सीआरझेड ना हरकत दाखला मिळण्यासाठी हेलपाटे माराव्या लागतात यामुळे याच एजन्सीमार्फत त्यांना परवानगी मिळवून द्यावी अशी सूचना केली. खवणेकर घराजवळील शौचालय व मळई जेटी येथील सार्वजनीक शौचालय दुरूस्तीचा विषयही चांगलाच गाजला. सत्ताधारी नगरसेवक बुवा तारी व नितीन बांदेकर यांनी दीड वर्षे होऊन गेली तरी संबंधित ठेकेदाराने शौचालय दुरूस्तीचे काम सुरू केले नाही.
त्या ठेकेदाराला एक महिन्याचीच मुदतवाढ द्या व त्याचाकडून दंड वसूल करा अशी मागणी केली यावर भाजपा गटनेते शरद ठुकरूल यांनी त्या कामाची नवीन निविदा काढावी अशी मागणी केली. मात्र या मागणीला सत्ताधारी नगरसेवकांनी आक्षेप घेतला व एक महीन्याचीच मुदतवाढ द्या व काम पूर्ण करून घ्या अशी मागणी केली.



























































