
सामना प्रतिनिधी । निफाड
निफाड तालुक्यातील देवगांव आता प्रगतिशील शेतकऱयांचे गाव म्हणून पुढे येऊ पाहत आहे. पारंपरिक शेतीचा अट्टहास सोडत येथील शेतकरी शेतीत विविध प्रयोग करत लाखोंची पिके घेत आहेत. अशा शेतकऱयांची यादी करायची झाल्यास त्यात फिरोज शाब्बुद्दीन शेख यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. आंबा फळबाग लागवड करत लाखोंचे उत्पन्न घेऊन त्यांनी तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
पारंपरिक पीक पद्धतीतून मिळणार उत्पन्न बघून फळबाग लागवड करण्याचा फिरोज शेखने प्रयत्न केला. प्रारंभी एक एकर जागेत त्याने काळे केशर वाणाचे १५ बाय १५ अंतरावर २०० आंब्याची झाडे लावली. या लागवडीस साधारणतः सतरा हजार रुपये खर्च आल्याचे तो सांगतो. लागवड काळापासून तिसऱया वर्षापासून फळधारणा होणार असल्याने या मधल्या कालावधीत आंतरपीक म्हणून सोयाबीन, कांदा, सिमला मिरची, कोबी, टोमॅटो, फ्लावर अशी फळ व भाजी पीक घेतली. यासाठी त्यांनी पंधरा गुंठय़ाचे शेततळे बनवून दर पंधरा दिवसांनी पाणी दिले.
तीन वर्षे तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेतलेल्या आणि आतापर्यंत खर्चच असलेल्या पिकातून आता उत्पादनाची आणि उत्पन्नाची वेळ होती. या कालावधीत एका फळ झाडास एक जाळी (क्रेट) आंबे लगडलेले होते. एका जाळीत साधारणतः सत्तर अर्धपक्व आंबे (कैऱ्या) समावतात. ज्यांचं वजन पस्तीस किलोपर्यंत असते. प्रथम वर्ष दोनशे जाळी उत्पन्न त्यांच्या पदरी पडले. त्यास एक हजार अठरा रुपये प्रती जाळी बाजारभाव मिळाला. यावर्षी त्यांना दोन लाख सदतीस हजारांचे उत्पन्न मिळाले असून खर्च वजा जाता दोन लाख वीस हजारांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. या फळं पिकास आयुर्मान पस्तीस वर्षे असून तोपर्यंत उत्पन्नाचा झोक सुरू असेल. या बाबत मिळालेल्या यशामुळे फिरोज यांनी आणखी दीड एकर क्षेत्रात आंबा लागवड करण्याचा मनोदय व्यक्त केला.

































































