धोनी-पंत आमने-सामने! चेन्नई भिडणार दिल्लीला, मुंबईत रंगणार लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल या नामवंत टी-20 स्पर्धेत उद्या चेन्नई सुपरकिंग्ज व दिल्ली पॅपिटल्स हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. यावेळी महेंद्रसिंग धोनीचा अनुभव आणि युवा रिषभ पंतचा जोश यांच्यामधील लढत तमाम क्रिकेटप्रेमींना बघायला मिळणार आहे.

एकीकडे मागील मोसमातील अपयश पुसून टाकण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जचा संघ जिवाचे रान करताना दिसेल तर दुसरीकडे रिषभ पंतच्या रूपात नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ या स्पर्धेची सुरुवात दमदार करण्यासाठी सज्ज असेल. दोन संघांमधील ही लढत मुंबईत रंगणार आहे.

नेतृत्वाचा कस लागणार

मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स संघाने मागील मोसमात उल्लेखनीय कामगिरी केलीय. मात्र या मोसमात श्रेयस अय्यर दिल्ली पॅपिटल्ससोबत नसणार आहे. दुखापतीमुळे तो स्पर्धेला मुकणार आहे. नुकतीच त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे रिषभ पंतच्या खांद्यावर या संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली.

पहिल्यांदाच तो या संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाचा कस लागेल हे निश्चित आहे. शिखर धवन, स्टीवन स्मिथ, उमेश यादव, इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन या दिग्गज खेळाडूंचा अनुभव व शिमरोन हेथमायर, मार्क्स स्टोयनीस, पृथ्वी शॉ या खेळाडूंचा जोश रिषभ पंतच्या दिमतीला असेलच.

रबाडा, नॉर्खिया, एनगिडीची अनुपस्थिती

पॅगिसो रबाडा, एनरीच नॉर्खिया व लुंगी एनगिडी हे दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू 6 एप्रिलला हिंदुस्थानात दाखल होणार आहेत. कारण आतापर्यंत ते मायदेशात पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळत होते. पॅगिसो रबाडा व एनरीच नॉर्खिया यांची अनुपस्थिती दिल्ली पॅपिटल्ससाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. तसेच लुंगी एनगिडीलाही चेन्नई सुपरकिंग्जसाठी सलामीच्या लढतीत खेळता येणार नाही.

दृष्टिक्षेपात

दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉने हिंदुस्थानात नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. त्याने 105 नाबाद, 227, 185 नाबाद आणि 165 अशी चार खणखणीत शतके झळकाविली आहेत. पृथ्वी शॉचा फॉर्म दिल्ली पॅपिटल्ससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज संघातील बहुतांशी क्रिकेटपटूंमध्ये सरावाचा अभाव प्रकर्षाने दिसून येतो. मोईन अली याने हिंदुस्थानविरुद्धच्या वन डे मालिकेत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले, पण इतर खेळाडू गेल्या काही महिन्यांमध्ये क्रिकेटपासून दूर आहेत. महेंद्रसिंग धोनी निवृत्त झालाय. रवींद्र जाडेजाला दुखापत झाली होती. सुरेश रैना व अंबाती रायुडू यांनी अखेर सामना जानेवारीत खेळला आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जसाठी सुरुवातीच्या काही लढती आव्हानात्मक असणार आहेत.

उभय संभाव्य संघ खालीलप्रमाणे

चेन्नई सुपरकिंग्ज – मोईन अली, फाफ डय़ुप्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, सॅम करण, ड्वेन ब्राव्हो, के. गौतम, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

दिल्ली पॅपिटल्स – पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीवन स्मिथ, रिषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), मार्क्स स्टोयनीस, शिमरोन हेथमायर, ख्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, अमित मिश्रा, इशांत शर्मा

आजची आयपीएल लढत
दिल्ली पॅपिटल्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज
मुंबई, सायंकाळी 7. 30 वाजता