
सामना प्रतिनिधी I खेड
बँकेचे बनावट एटीएम कार्ड तयार करून सेवा निवृत कर्मचाऱ्याला 21 हजाराचा गंडा घालणाऱ्या भामट्याचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत भेलसई गंगवाडी येथील गजानन कदम (69) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
गजानन कदम यांचे चिपळूण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बचत खाते आहे. दोन दिवसांपूर्वी कदम यांच्या खात्यातून कोल्हापूर आणि मालाड मुंबई येथून 21 हजार पाचशे रूपये काढण्यात आले. कदम यांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आल्यानंतर त्यांनी बँकेत धाव घेतली. बँकेत चौकशी केल्यावर त्यांना पैसे काढल्याचे सांगण्यात आले. एटीएम कार्ड स्वतःकडेच असताना खात्यातून परस्पर पैसे गायब होणे ही बाब गंभीर असल्याने कदम यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

























































