
क्रिकेट हा खेळ सध्या तीन फॉरमॅटमध्ये खेळला जातो. त्यामुळे खेळाडूंच्या फिटनेसला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाच्या या तिन्ही फॉरमॅटमध्ये यशस्वी व्हायचे असेल आणि सातत्य टिकवून ठेवायचे असेल तर तुम्हाला आपल्या फिटनेसचा दर्जा अधिक उंचावणे गरजेचे आहे, असा सल्ला हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी भावी क्रिकेटपटूंना दिला आहे. एजिस फेडरल इन्शुरन्स कप या 13 वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाचा घटक असून प्रत्येक संघाच्या प्रशिक्षकांनी यावर अधिक भर देण्याची गरज आहे. पुढे ते म्हणाले, कारण एखादा चांगला टिपलेला झेल, वाचवलेली धाव अथवा अचूक फेक करून मिळविलेली धावचीतची विकेट या गोष्टी सामन्याचा कौल तुमच्या बाजूने झुकवू शकतात. या वेळी एजिस फेडरल लाईफ इन्शुरन्सचे चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर गणेसा रत्नामदेखील उपस्थित होते.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रो वर्ल्ड टॅलेंट क्रिकेट अकादमी संघाने टायटन्स क्रिकेट अकादमीवर 76 धावांनी विजय मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली. प्रथम फलंदाजी करताना प्रो वर्ल्ड टॅलेंट अकादमीने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 187 धावांचे लक्ष्य उभारले. या आव्हानाचा पाठलाग करताना टायटन्स क्रिकेट अकादमी संघाला 20 ओव्हर्समध्ये केवळ 7 बाद 111 धावा करता आल्या. माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि एजिस फेडरल इन्शुरन्सचे गणेसा रत्नाम यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
संक्षिप्त धावसंख्या
प्रो वर्ल्ड टॅलेंट अकादमी
– 20 षटकांत 7 बाद 187
टायटन्स क्रिकेट अकादमी
– 20 षटकांत 7 बाद 111

























































