चांदोली, कोयनेतून विसर्ग वाढविणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. दोन्ही धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ सुरूच आहे. चांदोली धरण 64 टक्के भरले असून, धरणातून 851 क्युसेकने, तर कोयनेतून 2100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास शुक्रवारी सकाळपासून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत असून, 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी गुरुवारी रात्री 22 फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

चांदोली आणि कोयना धरण परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असून, दोन्ही धरणांत अतिवृष्टी सुरू आहे. चांदोली धरण क्षेत्रात 24 तासांत 77 मिलिमीटर पाऊस झाला. धरणात 21.91 टीएमसी पाणीसाठा असून, 64 टक्के धरण भरले. धरणातून 851 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाली. कोयना धरण क्षेत्रात 112 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात 44.71 टीएमसी पाणीसाठा झाला. धरणातून एकवीसशे क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा त्यामध्ये वाढ केली जाणार आहे.

जोरदार पाऊस होत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. दोन्ही नद्यांवरील 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदीवरील कोकरूड, चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगाव, दुधगाव, समडोळी, तांदुळवाडी, चावरे हे, तर कृष्णा नदीवरील नागठाणे, भिलवडी, मौजे डिग्रज, बोरगाव हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाच्या सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी गुरुवारी संध्याकाळी 20 फूट होती. अलमट्टी धरणात 1 लाख 21 हजार क्युसेकने आवक होत असून, सव्वा लाख क्युसेकने पाणी सोडले जात आहे. धरणाच्या पाणीसाठय़ाची क्षमता 123 टीएमसी असून, सध्या 87.99 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 13.5 मि. मी. पावसाची नोंद झाली.